मुंबईत मोठी कारवाई! वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेरील झोपडपट्टीसह अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कडक बंदोबस्त तैनात

Bandra News: मुंबईत पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी गरीब नगर झोपडपट्टी आणि अनधिकृत बांधकामांवर मोठी तोडक कारवाई सुरू केली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Bandra News: वांद्रे पूर्व परिसरात अनधिकृत घरं आणि बांधकामांवर हातोडा"
NDTV Marathi

Bandra News: मुंबई सेंट्रल आणि दादर स्थानकांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढता ताण लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी पावले उचलली आहेत. या विस्तारीकरण प्रकल्पासाठी वांद्रे पूर्व परिसरातील अनधिकृत बांधकामांसह गरीब नगर झोपडपट्टीवर आजपासून (19 मे) पाच दिवसांची मोठी तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्या चोख बंदोबस्तात ही कारवाई पार पडत आहे. वांद्रे टर्मिनसचा सध्याच्या सात प्लॅटफॉर्मच्या पुढे विस्तार करणे आणि अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

प्रकल्पाची सविस्तर माहिती आणि पार्श्वभूमी

मुंबई महानगर क्षेत्रात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. प्रवाशांची वाढती मागणी पाहता अधिक गाड्या चालवण्यासाठी पुरेशा प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता आहे, ज्यामुळे मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्सची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement

या मोहिमेत तोडक कारवाईनंतर जी जागा मोकळी होईल, तिचा वापर सर्वप्रथम वांद्रे टर्मिनस येथील डिझेल शेड हलवण्यासाठी केला जाईल. डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर मिळालेल्या अतिरिक्त जागेत टर्मिनसचा विस्तार केला जाईल आणि सात प्लॅटफॉर्मच्या पुढे नवीन प्लॅटफॉर्म उभारले जातील.

Photo Credit: NDTV Marathi

तोडक कारवाईचे नियोजन

19 मे ते 23 मे असे एकूण पाच दिवस ही तोडक कारवाई सुरू राहणार आहे.

सध्याची क्षमता आणि स्थानकांची स्थिती

पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वे टर्मिनल्सची सध्याची स्थिती खालीलप्रमाणे:

  • वांद्रे टर्मिनस: सध्या 7 प्लॅटफॉर्म आहेत, येथून दररोज सुमारे 21 लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ऑपरेशन सुरू असते. 
  • मुंबई सेंट्रल: 5 प्लॅटफॉर्म असून दररोज 20 गाड्या हाताळल्या जातात.
  • दादर: 2 प्लॅटफॉर्म असून दररोज 10 गाड्या हाताळल्या जातात.

(नक्की वाचा : Petrol Pump: तेल कंपन्यांनी इंधन पुरवठ्यात कपात केलीय? पुणे, पिंपरी-चिंचवडसह या 3 शहरांमध्ये काय आहे स्थिती?)

Photo Credit: NDTV Marathi

पश्चिम रेल्वेच्या इतर विस्तार योजना

वांद्रे टर्मिनसशिवाय पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी इतर दोन टर्मिनसवर काम सुरू आहे:

1. जोगेश्वरी टर्मिनस: येथे 2 प्लॅटफॉर्म आणि 12 गाड्या प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू असून यासाठी 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

2. प्रस्तावित वसई टर्मिनस: या ठिकाणी देखील 2 प्लॅटफॉर्म आणि 12 गाड्या प्रस्तावित असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

VIDEO: वांद्रे परिसरात अनधिकृत घरांवर तोडक कारवाई । Demolition action against unauthorized houses in Bandra