Mumbai Holi : कोळी बांधवांची 100 वर्षे जुनी परंपरा वादात; लोकलमधून सुपारीचं झाड नेणं पडलं महागात

मुंबईतील कोळी बांधवांची अशीच एक परंपरा आहे. जी ब्रिटीशकालीन असल्याचं म्हटलं जातं. मात्र या परंपरेचं पालन करीत असताना काही जणांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : महाराष्ट्रातील विविध ठिकाणांमध्ये होळीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. आजही या परंपरेचं पालन केलं जातं. मुंबईतील कोळी बांधवांची अशीच एक परंपरा आहे. जी ब्रिटीशकालीन असल्याचं म्हटलं जातं. मात्र या परंपरेचं पालन करीत असताना काही जणांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आल्याचं समोर आलं आहे.

काय आहे ही प्रथा-परंपरा?

मुंबईतील कोळी बांधव पालन करीत असलेल्या या परंपरेनुसार, दरवर्षी होळी पेटविण्याच्या आदल्या दिवशी विरारहून सुपारीचं झाड माहीमला आणलं जातं. यावेळी वाजत-गाजत आणि होलिका देवीचा जयघोष करीत कोळी बांधव हे झाड माहीमला आणतात. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा सुरू असल्याचं कोळी बांधव सांगतात. विशेष म्हणजे विरारहून माहीमपर्यंत हे झाड आणण्यासाठी लोकल ट्रेनची मदत घेतली जाते. लोकल ट्रेनला हे झाड बांधलं जातं.

नक्की वाचा - Mumbai Video : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; प्रसिद्ध दालखिचडीमध्ये भयंकर जीव; ग्राहकाने आवाज चढवताच मॅनेजरने..

नेमकं काय घडलं? 

परंपरागत होळी साजरी करण्यासाठी माहीमच्या मोरी रोड येथील रहिवाशांनी विरारहून सुपारीचे झाड लोकलला बांधले. रविवारी (१ मार्च) रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या विरार-चर्चगेट लोकलमध्ये हा प्रकार घडला. हे झाड बांधण्यासाठी लोकलही काही काळ स्थानकात थांबवण्यात आली होती. रात्रीची वेळ असल्यानं प्रवाशांची इतकी गर्दी नव्हती. पण, लोकल थांबवली गेल्यामुळे वेळापत्रक बिघडलं आणि लोकल सेवेवर याचा परिणाम झाला. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. याप्रकरणी आता रेल्वे प्रशासनाने सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाराची माहिती मिळताच लोकल बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली असता तिथे कर्तव्यावर असलेल्या स्थानक व्यवस्थापक रणजित कुमार यांनी लोकलची डब्याची पाहणी केली. झाड हे लोकलच्या दरवाजाला बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांना चढण्या-उतरण्यास अडचण येत असल्याचे दिसून आले. सुपारीचे झाड बांधण्यासाठी लोकल थांबवली गेल्यामुळे वेळापत्रकावर २० मिनिटांचा फरक पडल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. यावर तत्काळ कारवाई करुन संबंधित व्यक्तींना डब्यातून खाली उतरवण्यात आलं. याप्रकरणी आकाश ढोणे (३३), सागर बने (२२), अनिल कुमार सिंग (२२), अशोक गुंजलप्पा (२७), ब्रह्मदेना हुसैन (३८), शेखर कोळी (३७) या ६ जणांविरोधात रेल्वे अधिनियम कलम १४५ (ब) आणि १४५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.