Mumbai News : तुकाराम मुंढेंचा दणका! क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ते MIG; मुंबईतील 5 नामांकित क्लब्सवर मोठी कारवाई

तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

FDA takes action against Mumbai clubs : तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील पाच नामांकित क्लब्सचे परवाने निलंबित केले आहेत. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील एकूण ७ क्लब/कॅन्टीन/रेस्टॉरंट आस्थापनांची २७ जुलै रोजी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 05 अन्न आस्थापनांचे परवाना निलंबिन करण्यात आले, एक अन्न आस्थापनेस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली तर एका अन्न आस्थापनेस सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.
 
परवाना निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आरके जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, द विलिंगटॉन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे. तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

'या' आस्थापनांचा परवाना तत्काळ निलंबन

1)     The Cricket Club of India Ltd. 

शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्याच्या जागा वेगवेगळ्या नव्हत्या. अन्न हाताळणी आणि कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जिवंत झुरळांचा आणि माश्यांचा मोठ्या  प्रमाणावर प्रादुर्भाव होता. तुंबलेले नाले आणि झुरळांचे सापळे, ज्यामुळे अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली होती. स्वयंपाकघरातील ओट्यांवर झाडूचा वापर, ज्यामुळे दूषित होण्याचा धोका निर्माण होतो. बुरशी लागलेल्या खराब भाज्या, जास्त पिकलेली मशरूम आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवणे. FIFO/FEFO पद्धतींचा अभाव आणि खाद्यपदार्थांवर अपुरे लेबलिंग. अन्नाच्या संपर्कात येणारी भांडी धुताना आणि हाताळताना थेट जमिनीवर ठेवली जात होती. रंगानुसार ओळखचिन्ह असलेल्या चॉपिंग बोर्डचा वापर केला नव्हता. यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशनचा  धोका वाढतो. अन्नपदार्थांच्या संपर्कात येणारी उपकरणे, फरशी आणि गटार वाहिन्यांवर ग्रीस, घाण, गाळ आणि साचलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात संचय होणे.
      
2)    RK Juhu Gymkhana

Advertisement

वैयक्तिक स्वच्छतेसाठी पुरेशा सुविधा नाही. कच्चा माल वापरण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ करून तपासला जात नाही. तळण्यासाठी वापरलेल्या तेलाची नोंद ठेवली जात नाही. भिंती आणि छत ठिसूळ झाले आहेत आणि त्याचे कण अन्नात पडत आहेत. FIFO/FEFO पद्धतींचा अभाव आणि खाद्यपदार्थांवर अपुरे लेबलिंग. शिजवलेले अन्न योग्य तापमानात साठवले जात नाही. स्वच्छतेचे वेळापत्रक अद्ययावत नाही. स्वयंपाक गृहातील डे़नेज सुस्थितीत नाही आणि ते कीटकांच्या प्रजननाचे ठिकाण बनू शकतात. अन्न हाताळणाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते आणि हातमोजे, टोप्या व ॲप्रन वापरले जात नाहीत.

नक्की वाचा - जेजेनंतर बदलापुरातील नामांकित ब्लड बँकेला टाळं; तुकाराम मुंढे आता 'रक्तचोरी'चा भांडाफोड करणार

3) The Aparna  Juhu Gymkhana
                      
स्वयंपाकाची उपकरणे गंजलेली आहेत. वैयक्तिक स्वच्छतेसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाही. पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड म्हणून प्रमाणित नाही. शिजवलेले, न शिजवलेले, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांचे योग्य वर्गीकरण केलेले नाही. उपकरणे वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर निर्जंतुक केली जात नाहीत. कीटकांचा, विशेषतः माश्यांचा वावर आढळून आला. अन्न हाताळणाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते आणि हातमोजे, टोप्या आणि ॲप्रन वापरले जात नाहीत.
अंतर्गत किंवा बाह्य ऑडिट केलेले नाही.

4)  MIG Cricket Club, Bandra East
           
अनधिकृत तृतीय-पक्षीय कामकाज: तपासणीत असे आढळून आले की, मे. नेबुला केटरिंग  सर्व्हिसेस नावाची एक अनधिकृत संस्था, वैध FSSAI परवाना न बाळगता, केटरिंग कराराअंतर्गत परिसरात कार्यरत होती. सर्व खरेदी आणि विक्रीचे व्यवहार या अनधिकृत संस्थेच्या नावाने केले जात होते. येथे गंभीर अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. स्वयंपाकघराच्या परिसरात जिवंत झुरळांचा वावर   आणि जाळं-जळमटं आढळून आले. कच्चे, शिजवलेले, शाकाहारी आणि मांसाहारी  खाद्यपदार्थ योग्य वर्गीकरणाशिवाय साठवले जात होते, ज्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशनचा (एकमेकांत मिसळण्याचा)धोका निर्माण झाला होता. पाणी आणि अन्न चाचणी वेळोवेळी करुन खातर जमा केली जात नाही. क्लबने परवाना प्राधिकरणाला सूचित न करता  किंवा त्यांचीपूर्वपरवानगी न घेता आस्थापनेची जागा बदलली आणि व्यवस्थापन संरचना अद्ययावत केली, ज्यामुळे FSSAI च्या परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाले. प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी आणि आरोग्य नोंदींचा अभाव आढळून आला. उत्पादनावर देखरेख ठेवण्यासाठी कोणतेही  पात्र तांत्रिक कर्मचारी तैनात केले नव्हते 

5) The Willingdon sports club

तापमान निरीक्षण प्रणाली पुरेशी नाही. फरश्या निसरड्या आणि अस्वच्छ आहेत. अन्न आणि पाणी तपासणी अहवाल अद्ययावत ठेवले जात नाहीत. भिंती आणि छत ठिसूळ झाले आहेत आणि त्याचे कण अन्नात पडत आहेत. FIFO/FEFO पद्धतींचा अभाव आणि खाद्यपदार्थांवर अपुरे लेबलिंग. पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड म्हणून प्रमाणित नाही. स्वच्छतेचे वेळापत्रक नाही. गटारांची देखभाल केली जात नाही आणि ते कीटकांच्या प्रजननाचे ठिकाण बनू शकतात. अन्न हाताळणाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते.

Advertisement


6) व्यवसाय बंद सूचना 

M/s. Goregaon Sports Club, Malad West : तपासणी दरम्यान येथे नोंदणी/परवान्या शिवाय व्यवसाय करीत असल्याचे तसेच कायदेशीर तरतुंदीचे उल्लंघन आढळून आले. येथे अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.