VIDEO: उत्तर भारतीय विद्यार्थिनीचा मराठी बाणा, SSCमध्ये मिळवलेले मार्क पाहून मंत्री प्रताप सरनाईकही भारावले

SSC Result News: हिंदी भाषिक विद्यार्थिनी सपना कुमारी साहने इयत्ता दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 91 गुण मिळवले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिच्या घरी भेट देऊन तिचे कौतुक केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Education Success Story: प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषिक विद्यार्थिनीची भेट घेऊन केले कौतुक"
Pratap Sarnaik X

SSC Result News: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे एका हिंदी भाषिक विद्यार्थिनीने सिद्ध करून दाखवले आहे. मूळची उत्तर भारतीय असलेल्या सपना कुमारी साह या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत चक्क मराठी विषयात 91 गुण मिळवून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या या यशाची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले.

सपना कुमारी साह ही हिंदी भाषिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलगी आहे. घरात मराठी भाषेचा कोणताही वारसा नसताना तिने शालेय जीवनात या भाषेवर कमालीचे प्रभुत्व मिळवले. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिने मराठी विषयात मिळवलेले 91 गुण हे केवळ तिचे यश नसून भाषेप्रती असलेली तिची आपुलकी असल्याची साक्ष आहे.

Advertisement

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सपनाचे केले कौतुक

सपनाच्या या प्रेरणादायी यशाची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी सपना आणि तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सपनाशी मराठी भाषेत संवाद साधला असता, तिने अतिशय शुद्ध आणि अस्खलित मराठीत त्यांना उत्तरे दिली. तिचे ते संभाषण ऐकून मंत्री भारावून गेले.

(नक्की वाचा: Shirdi News: 'या' विद्यार्थ्याच्या SSC निकालाची महाराष्ट्रभर चर्चा, 6 विषयातील मार्क्स पाहून टॉपरही झाले थक्क)

राज्यात रिक्षाचालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आल्याच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "बाकीच्या रिक्षावाल्यांना कळू दे, बघा आमची हिंदी भाषिक उत्तर भारतीय मुलगी मराठी किती शुद्ध बोलते".

VIDEO: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सपनाच्या यशाचे केले कौतुक

सपना कुमारी साहच्या यशाचे सर्वत्र कौतुक

सपनाच्या या यशाचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. कठीण परिश्रमाने भाषिक अडसर दूर करून प्रादेशिक भाषेवर मिळवलेले हे वर्चस्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.

Advertisement