Mumbai News: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांना जोडणारं दादर हे एक महत्त्वाचं स्टेशन आहे. या दादर स्टेशनमध्ये येत्या काळात मोठा बदल होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीचा ताण करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लवकरच दादरमध्ये निर्माण केलं जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तार प्रकल्पाचा हा एक महत्त्वपूर्ण भाग असून, यामुळे लोकल गाड्यांच्या नियोजनात मोठी सुधारणा होणार आहे.
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आणि स्वरूप
गर्दीच्या वेळी जास्तीत जास्त लोकल गाड्या चालवणे शक्य व्हावे, हा या विस्ताराचा मुख्य उद्देश आहे. सध्या दादर स्थानकावर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या व्यवस्थापनात अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. नवीन प्लॅटफॉर्म तयार झालं तर या समस्या दूर होतील.
नवीन प्लॅटफॉर्म बांधल्यामुळे दोन्ही रेल्वे मार्गावरील उपनगरी गाड्यांचे व्यवस्थापन देखील सुधारेल. लोकल गाड्यांची कोंडी होणारी ठिकाणे कमी होतील, परिणामी लोकलच्या वक्तशीरपणात वाढ होईल.
(नक्की वाचा- TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर)
भूसंपादन आणि अतिक्रमणांचा अडथळा
या प्रकल्पासाठी पश्चिम बाजूने भूसंपादनाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. दळवी नगर येथील 46 अतिक्रमणे निश्चित करण्यात आली असून, रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बहुतांश अतिक्रमणांचा प्रश्न पुनर्वसन प्रकल्पातून सोडवला जात आहे. अनेक अतिक्रमीत बांधकामे आधीच पाडण्यात आली आहेत. एका मराठी वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
(नक्की वाचा- Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)
प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार
या नव्या बदलामुळे दादर स्थानकावरील सध्याच्या प्लॅटफॉर्मच्या रचनेतही बदल होणार आहे. नव्या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीनंतर सर्वच प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलले जातील. मात्र काम कधी सुरु होईल, कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.