मुंबईतील जुहू बीचवर (Juhu Beach) सध्या अरबी समुद्रात रोल्स रॉयस कारच्या आकाराची बोट फिरताना दिसत आहे. 'समुद्रातील कार' म्हणून ओळखले जाणारे हे वॉटरक्राफ्ट जुहू बीचवरील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या पर्यटन इनोव्हेशनपैकी एक बनले आहे.
दुबईतील स्वप्न साकार
या अनोख्या वॉटरक्राफ्टचे शिल्पकार प्रमोद पवार आहेत. दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी असेच लक्झरी-थीम असलेले जहाज पाहिले होते आणि तो अनुभव भारतात आणण्याचा त्यांनी निश्चय केला.
प्रमोद पवार यांनी याबाबत म्हटलं की, दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील भेटीदरम्यान त्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी तिथून स्केचेस आणि निरीक्षणे घेऊन मायदेशी परतण्याचा संकल्प केला आणि महाराष्ट्रातील स्थानिक पाण्याच्या परिस्थितीनुसार जहाज बनवण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भरतीची स्थिती आणि सुरक्षा विचारात घेऊन बोटमध्ये मोठे बदल केले. याचा परिणाम म्हणजे, पाच लोकांना बसण्याची क्षमत असलेली आणि समुद्रात 1.8 नॉटिकल मैलपर्यंत प्रवास करणारी एक प्रीमियम बोट तयार झाली. या बोटीत ऑनबोर्ड संगीत, आलिशान इंटिरियर्स आणि समुद्राच्या खारट पाण्यात मस्ती केल्यानंतर अंघोळीसाठी शॉवरची सुविधाही आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाला प्रोत्साहन
महाराष्ट्रामध्ये जेट स्कीइंगपासून पॅरासेलिंगपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेले बहुतांश जलक्रीडा आधीच उपलब्ध आहेत. पण 'कार बोट' सारख्या आकर्षणांमुळे यात भर पडली आहे. रोल्स रॉयस जहाजामागील टीम फ्लायबोर्डिंग तसेच फेरारी आणि लॅम्बोर्गिनी आकाराच्या बोट आणण्याची योजना आखत आहे, असं प्रमोद पवार म्हणाले.
प्रमोद पवार यांनी पुढे म्हटलं की, आम्हाला इथेच थांबायचे नाही, तर आमच्या पाण्यात शक्य तितके नवीन खेळ आणायचे आहेत. त्यांनी सरकारला आवाहन केले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रयोगांना देशात प्रोत्साहन द्यावे.