Mumbai News: रेल्वे प्रवासात शिस्त राखण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या 10 महिन्यांच्या कालावधीत रेल्वेने तिकीट तपासणीची व्यापक मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 27 लाखांहून अधिक विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून 172 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.
एसी लोकलमध्ये 3.5 कोटींची वसुली
मुंबईकरांची पसंती असलेल्या वातानुकूलित (AC) लोकलमध्येही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने सुमारे 3.5 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत. या मोहिमेत पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी अनेक फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आणली, ज्यामुळे रेल्वेचा बुडणारा महसूल वाचला आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापूरकरांची लूट थांबवा! भाजप नेत्यांची RTO कडे मोठी मागणी)
प्रवासात शिस्त आणण्याचा प्रयत्न
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली ही मोहीम राबवली जात आहे. मुंबई लोकल, लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस आणि सुट्ट्यांनिमित्त सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये वारंवार तपासणी केली जात आहे. तिकीटधारक प्रवाशांना त्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा आणि त्यांना विनाकारण गर्दीचा त्रास होऊ नये, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे.
महसूल वाढवण्यावर भर
विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये नियमांचे पालन करण्याची सवय लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.