मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांधकाम व्यावसायिक प्रतीक वीरा याच्या कार्यालयावर छापेमारी केली. वीरा याचे कार्यालय दादर येथील सनशाईन टॉवरमध्ये असून वीरा याने 13.65 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. वीरा याच्याविरोधात बांधकाम व्यावसायिक असलेल्या कश्यप मेहता याने तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
भांडूपमध्ये समृद्धी गार्डन नावाचा एक गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात आला होता. सनशाईन ग्रुपने हा प्रकल्प उभारला होता. कश्यप मेहता आणि अतुल भरणी हे या ग्रुपचे भागीदार आहेत. त्यांनी प्रतीक वीरा याचे वडील जयेश वीरा यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात समुहातील 20 टक्के भागीदारी दिली होती. कंपनीचे सगळी हिशोबाची कामे जयेश वीरा यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांना देण्यात आली होती. जयेश याचा मुलगा प्रतीक याने सीवाना रिअल्टी नावाच्या कंपनीसोबत मिळून समृद्धी गार्डन या प्रकल्पातील फ्लॅट विकले होते. यातून त्याने 13.65 कोटींची माया गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीरा याने मेहता आणि भरणी यांच्याविरोधात एनसीएलटी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र दोन्ही ठिकाणी आदेश वीराच्या विरोधात गेले होते. वीरा याने या न्यायालयीन खटल्यांसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप आहे.