- मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा प्रवास लांबतो
- सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 180 मीटर उंच केबल स्टेड पूलसहित महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात
- या प्रकल्पामुळे लोणावळा-खंडाळा घाटातील अवघड वळणे टळून मुंबई पुणे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोंडी झाली तर काही तासांचा प्रवास हा लांबतो शिवाय तो कंटाळवाणा ही होतो. या एक्सप्रेस वेवर 2026 च्या सुरुवातीलाच 43 किमी लांब रांगा लागल्याचे सर्वांनीच पाहीले. त्यामुळे या मार्गावरील समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मात्र, प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना लोणावळा-खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीतून कायमची सुटका मिळणार आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर लोणावळ खंडाळा घाटातून जाण्याची गरज पडणार नाही.
यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये अभियांत्रिकीचा चमत्कार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 180 मीटर उंचीचा भव्य 'केबल स्टेड' पूल उभारला जात आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक प्रकल्प मानला जातोय. विशेष म्हणजे, या पुलामुळे आणि बोगद्यांमुळे मुंबई ते पुणे हे अंतर 6 किमीने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. शिवाय घाटाची कटकट मिटणार आहे. अनेकांना घाटातून प्रवास करण्याचा त्रास होतो. तो त्रास मात्र कायमचा दुर होण्यास मदत होईल.
या बोगद्यांचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. मिसिंग लिंकमध्ये खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान दोन मोठे बोगदे आहेत. यातील मुख्य बोगदा 8.87 किमी लांबीचा असून दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.67 किमी आहे. या बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ फिनिशिंगची कामे शिल्लक आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर केवळ लोणावळ्यात प्रवेश करायचा असेल तरच जुन्या घाटाचा वापर करावा लागेल, अन्यथा थेट वेगवान प्रवास शक्य होईल. तुम्ही मुंबईहून पुण्याला नेहमी जाताय? मग खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकचा अनुभव तुम्हाला नक्कीच असेल. पण आता काळजी नको! कारण मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना आता खंडाळा घाट न चढता थेट पुण्याला पोहोचता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण लांबी: 14 किलोमीटरची मिसिंग लिंक.
- बोगदे: दोन मोठे बोगदे, जे प्रवासाचा वेळ वाचवतील.
- वेळेची बचत: साधारण 30 मिनिटे कमी वेळ लागेल.
- सध्याची स्थिती: बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.