- छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला
- जलील यांच्या प्रचारादरम्यान काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जमावाने त्यांच्यावर अंडी फेकल्याचे समोर आले
- आक्रमक तरुणांनी जलील यांची गाडी रोखण्याचा व फोडण्याचा प्रयत्न केला,
मोसीन शेख
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या दोन गटात जोरदार राडा झाला. या राड्यात एका गटाने एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने त्यांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न केला. तणाव वाढल्याने पोलीसांना इथे लाठीचार्ज करावा लागला. त्या आधी जलील प्रचार करत असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. शिवाय जमावाने अंडी ही फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संभाजीनगरच्या बायजीपुरा परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर परिसरात पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
एमआयएम नेते इम्तियाज जलील हे सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आहेत. ते पक्षाच्या उमेदवारांचा शहरात प्रचार करत आहे. प्रचारासाठीच ते बायजीपुरा या भागात आले होते. यावेळी काही नाराजांचा गट त्यांच्या समोर आला. जलील यांनी पैसे घेवून तिकीट वाटल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे बडखोर उमेदवार हे रिंगणात आहे. त्यांच्या नाराजीलाच जलील यांना समोरे जावे लागले. या आधी जलील यांना काळे झेंडे दाखवले गेले. त्यानंतर अंडी फेकण्यात आली. त्यामुळे तेथील वातावरण चिघळले गेले.
परिस्थिती पाहून जलील त्या ठिकाणाहूना आपल्या गाडीतून जात होते. त्यावेळी काही आक्रमक तरुणांनी त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. काहींनी गाडीवर चढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला. तर काहींनी त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न जलील यांच्या कार्यकर्त्यांनी निष्फळ केला. पोलीसांनी ही त्यावेळी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला जलील यांनी स्वत:च घडवून आणल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. आम्ही हा हल्ला केला नाही. आम्ही एमआयएमकडून उमेदवारी मागितली होती. पण पैसे घेवून जलील यांनी तिकीट वाटप केले. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितच्या पॅनेलकडून आम्ही उभे असल्याचं तिथल्या स्थानिक उमेदवार कलीम कुरेशी यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा माहोल नाही. त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वातावरण निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हे आरोप जलील यांनी फेटाळून लावले आहेत. काही जणांना हा एरिआ आपलाच आहे असं वाटत आहे. त्यामुळे ते दहशत निर्माण करत आहेत. अशा प्रवृत्तीं विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील यांच्या विरोधात सध्या सर्व एमआयएमचे बंडखोर एकवटले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या भागात पोलीसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
या घटनेनंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. हा हल्ला भाजप मंत्री अतूल सावे आणि संजय शिरसाट यांच्या मार्फत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे गुंड भाड्याने पाठवण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं आहेत. मात्र त्यांच्या या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही असं ही ते म्हणाले. तर अतुल सावे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अस घाणेरडं राजकारण कधी केलं नाही असं स्पष्टीकरण ही त्यांनी दिलं. ज्या भागात ही घटना घडली त्या ठिकाणी आमचे उमेदवारही उभे नाहीत असं ही ते म्हणाले. तर जलील यांनी पैसे घेवून तिकीट वाटप केल्याचा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवाय त्यांनी केलेला आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडेन असं प्रति आव्हान त्यांनी जलील यांना दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world