- नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवार दशरथ घरत यांनी गुजराती भाषेत प्रचार केला
- नवी मुंबईची आगरी कोळी संस्कृती पुसण्याचा भाजपचा डाव असल्याचा मनसेचा गंभीर आरोप
- सानपाडा- वाशी भागातून निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार मराठी पण प्रचार गुजरातीत
राहुल कांबळे
महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. सर्वच पक्ष सर्वस्व झोकून प्रचार करत आहेत. वेगवेगळ्या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या केल्या जात आहेत. यातूनच नवी मुंबईतील भाजप उमेदवाराने चक्क गुजरातीत प्रचार चालवला आहे. आपल्यालाच मतदान करावे याची जाहीरातच त्याने मराठीत न देता चक्क गुजराती भाषेत दिली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार मराठी आहे. दशरथ घरत असे या भाजप उमेदवाराते नाव असून ते सानपाडा- वाशी भागातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या या कृतीचा मनसेने जोरदार विरोध केला आहे. भाजपचा हा डाव वेळीच ओळखा असे आवाहन मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केले आहे.
दशरत घरत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रभागात एकूण चार उमेदवार आहेत. त्यांच्या फोटोसह ही जाहीरात छापण्यात आली आहे. त्यात भाजपला मतदान करा असे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व उमेदवार हे मराठी आहेत. पण ते ज्या प्रभागातून उभे आहेत त्या ठिकाणी गुजराती आणि मारवाडी मतदाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारांना चुचकारण्यासाठी गुजरातीतून प्रचार केला जात आहे असा आरोप मनसेने केले आहे. नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची नवी मुंबई आहे. ही ओळख पुसण्याचा भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोप ही काळे यांनी या निमित्ताने केला आहे. त्यामुळे मनसेने भाजपला कोंडीत पकडले आहे.
भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय नगरसेवक जास्त निवडून आले तर महापौर हा उत्तर भारतीयच होईल असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर त्यांनी सारवासरव केली होती. पण भाजपचा उद्देश काय आहे हे स्पष्ट आहे असं काळे यांनी यावेळी सांगितले. शिवाय नवी मुंबई गुजराती आणि मारवाड्यांची कधी झाली असा प्रश्न ही त्यांनी केला. नवी मुंबईची ओळख आणि संस्कृती ही वेगळी आहे. ती पुसण्याचा प्रयत्न कुणी करू नये असं ही त्यांनी स्पष्ट केलं. इथं गुजराती भाषेतून प्रचार करण्याचा अर्थ काय अशी विचारणा ही त्यांनी केली.
भाजपचा हा डाव नवी मुंबईकरांनी वेळीच ओळखावा असं काळे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. जेव्हा जेव्हा मराठीवर आक्रमण होईल त्यावेळी आम्ही धावून जावू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठी आणि हिंदूत्व हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे मराठीशी कोणती ही तडजोड करणार नाही असं ही ते म्हणाले. त्यामुळे मतदारांनीच आता या भाजपला धडा शिकवावा असं आवाहन गजानन काळे यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे मनसे यांच्यात लढत होत आहे. मंत्री गणेश नाईक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world