मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भव्य ‘मिसिंग लिंक' प्रकल्प 1 मे रोजी यशस्वीरित्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) विकसित केलेल्या या 13.3 किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण मार्गामुळे खंडाळा घाट विभागातील अत्यंत अवघड आणि धोकादायक वळणे टाळणे आता शक्य झाले आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला असून प्रवासाचा वेळही 30 मिनिटांनी कमी झाला आहे.
हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता या प्रकल्पाच्या नामकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या नवीन बोगद्याला आणि प्रकल्पाला 'शिंग्रोबा धनगर' यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी पुण्यातील उद्योग क्षेत्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज'चे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी घाटाचा इतिहास आणि शिंग्रोबा धनगर यांच्या बलिदानाचा उल्लेख करत या प्रकल्पाला त्यांचेच नाव देणे कशी योग्य आदरांजली ठरेल, हे पटवून दिले आहे.
कोण होते शिंग्रोबा धनगर?
दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शिंग्रोबा धनगर यांच्याबद्दल अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक माहिती दिली आहे. 19 व्या शतकात जेव्हा इंग्रजांना मुंबई ते पुणे दरम्यानच्या भोर घाटातून (खंडाळा घाट) मार्ग काढणे कठीण जात होते, तेव्हा 'शिंग्रोबा धनगर' या स्थानिक वाटाड्याने इंग्रजांना अत्यंत सोपा, सरळ आणि सुरक्षित मार्ग शोधून दिला.
या बदल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी शिंग्रोबा यांना मोठे बक्षीस किंवा जहागीर देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शिंग्रोबा यांनी बाणेदारपणे उत्तर दिले, "मला तुमचे कोणतेही बक्षीस नको, तुम्ही फक्त आमचा देश सोडून निघून जा!" या उत्तरामुळे इंग्रजांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी शिंग्रोबा धनगर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.
शिंग्रोबा मंदिराची स्थापना
या बलिदानानंतर खंडाळा घाटातून प्रवास करताना ब्रिटीश आणि स्थानिक लोकांच्या गाड्या वारंवार बंद पडू लागल्या आणि अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे शिंग्रोबा यांच्या स्मृतीप्रत्यर्थ घाटात एक मंदिर उभारण्यात आले. आजही जुन्या घाटातून प्रवास करताना हजारो वाहनचालक सुरक्षित प्रवासासाठी शिंग्रोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन नाणी अर्पण करतात.
औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी गती
हा 'मिसिंग लिंक' प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी एक गेम-चेंजर ठरत असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. चाकण, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई परिसरातील पुरवठा साखळी यामुळे अधिक वेगवान झाली आहे. आता या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या नामकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.