Mumbai Pune Expressway अन्न ,पाणी नाही,टॉयलेटही नाही, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवाशांची अवस्था कशी आहे?

Mumbai-Pune Expressway Traffic Jam:  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बुधवारी (4 फेब्रुवारी 2026) प्रवाशांसाठी नरकयातना ठरला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai-Pune Expressway Traffic Jam: गेल्या 24 तासांपासून हजारो प्रवासी या महामार्गावर अडकून पडले आहेत.
मुंबई:

Mumbai-Pune Expressway Traffic Jam:  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बुधवारी (4 फेब्रुवारी 2026) प्रवाशांसाठी नरकयातना ठरला. खंडाळा घाटात झालेल्या एका टँकर अपघातामुळे या महामार्गावर तब्बल 40 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या 24 तासांपासून हजारो प्रवासी या महामार्गावर अडकून पडले असून, त्यांच्याकडे ना अन्न आहे, ना पिण्यासाठी पाणी. या भीषण वाहतूक कोंडीमुळे मुंबई आणि पुण्याचे अंतर पार करण्यासाठी चक्क 10 ते 15 तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे.

महामार्गावर प्रवाशांचे भीषण हाल

मंगळवारी संध्याकाळी खंडाळा घाटात प्रोपलिन गॅस वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला. हा वायू अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली. 

मात्र, या निर्णयाचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे तर प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि जवळपास कोणतीही हॉटेल नसल्याने लोक भुकेने व्याकुळ झाले आहेत. विशेषतः टॉयलेटची सुविधा उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

( नक्की वाचा : Pune News: चला मुंबईला! हिंजवडी ते मुंबई प्रवासातील दीड तासाचा अडथळा दूर होणार; वाचा ST चा नवा प्लॅन! )

प्रशासकीय ढिसाळपणावर संताप

प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. अनेक प्रवाशांच्या मते, प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाहीये. केवळ टोल वसुलीमध्ये रस असलेल्या प्रशासनाला प्रवाशांच्या जीवाची पर्वा नाही का, असा सवाल आता विचारला जात आहे. एरवी 3 तासांत पूर्ण होणाऱ्या या प्रवासासाठी लोकांना 16 ते 20 तास महामार्गावरच काढावे लागत आहेत. संकटकाळात मदत कार्य करण्यासाठी कोणतीही रेस्क्यू टीम किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

Advertisement

गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू

महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलटी झालेल्या टँकरमधून गॅस गळती सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. या टँकरमधील गॅस आधी दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरून घेतला जाईल आणि त्यानंतरच रस्ता मोकळा केला जाईल. वळणाचा रस्ता असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. मात्र, हे काम पूर्ण व्हायला किती वेळ लागेल, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.

राजकीय टीकेची झोड

या परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मुंबई-पुणे अंतर हायपरलूपने 20 मिनिटांत पार करण्याचे स्वप्न दाखवले होते, मात्र आता साध्या प्रवासासाठीही 24 तास लागत आहेत, असा टोला मनसेने लगावला आहे. निवडणुका नसल्याने सत्ताधारी लोकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
 

Advertisement
Topics mentioned in this article