Mumbai Pune Flight Ticket Hike : इंडिगो (Indigo Flight) विमानसेवेचा बोजवारा उडाला आहे. याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वेळेवर तिकीट काढलं, त्याचे पैसे दिले मात्र प्रवासादरम्यान मिळणाऱ्या मनस्तापामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे अन्य विमान कंपन्या स्वत:चा खिसा भरत असताना दिसत आहे. मुंबई ते पुणे विमान प्रवासाचे दर तब्बल ६७ हजारांपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासाचे दर ५० हजारांहून जास्त असल्याचं समोर आलं आहे.
इंडिगोमुळे इतर विमानसेवांचे तिकीट महागले...
सर्वसाधारणपणे विमान प्रवासाचे दर बदलत असतात. सुट्टी किंवा सण-उत्सवात विमान तिकिटाचे दर वाढतात. सध्या इंडिगोच्या गोंधळामुळे इतर विमान कंपन्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक ठिकाणी तर तिकिटाचे दर नियमित दरापेक्षा तीन पटीने वाढल्याचं दिसत आहे. इतर वेळेस मुंबई ते पुणे तिकीट ५ ते ७ हजारांपर्यंत तर कधी याहून कमी असतं. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे इतर विमान कंपन्यांची मागणी वाढली आहे. परिणामी तिकिटाचे दर कित्येक पटीने वाढले आहेत. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
महागडं तिकीट काढूनही विमान विलंबानेच...
महागडं तिकीट काढूनही प्रवाशांना विमानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पुण्यात दहा विमान स्लॉट आहेत. यातील नऊ ठिकाणी इंडिगोची रद्द झालेली विमानं उभी आहेत. त्यामुळे पुण्याहून निघाणाऱ्या इतर विमानांना जागा उपलब्ध होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
मुंबई ते बंगळुर - ४० हजार
मुंबई ते दिल्ली - ५५ हजार ते ७७ हजार
मुंबई ते पुणे - ६७ हजार