खेळाचं मैदान गाजवणाऱ्या एका राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील एका तरुण उद्योगपतीला आपल्या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत तब्बल 63 लाख रुपये उकळणाऱ्या फरखंदा खान हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
कोण आहे फरखंदा खान?
फरखंदा खान ही जम्मू-काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू असून ती महिला टी-20 लीगमध्येही खेळली आहे. तिने आपला भाऊ बाझिल अझीझ खान आणि साथीदार इम्तियाज वाणी यांच्या मदतीने हा खंडणीचा कट रचला होता.
प्रेमाचं नाटक अन् 63 लाखांची खंडणी
या गुन्ह्याची मोडस ऑपेरंडी अत्यंत नियोजनबद्ध होती. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे राहणारा व्यावसायिक 2024 मध्ये पश्चिम उपनगरात राहत असताना फरखंदाच्या संपर्कात आला. त्यांच्यात जवळीक वाढली आणि चॅटिंग सुरू झाले. एप्रिल 2024 मध्ये फारखांदाने पैशांची मागणी केली. व्यावसायिकाने नकार देताच तिने 'मोबाईलवरील खासगी चॅट्स' सार्वजनिक करण्याची आणि बलात्कारात अडकवण्याची धमकी दिली. भीतीपोटी व्यावसायिकाने सुरुवातीला 23 लाख आणि नंतर 40 लाख रुपये दिले. हे पैसे फरखंदाचा भाऊ, वडील आणि साथीदार इम्तियाज वाणी यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
व्यावसायिकाने अखेर धीर धरून मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. फरखंदा आणि तिचा भाऊ बाझिल खान यांना दिल्लीतील एका नामांकित हॉटेलमधून अटक केली, तर त्यांचा साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगरमधून ताब्यात घेण्यात आले. फरखंदाचा भाऊ बाझिल हा सातत्याने संबंधित उद्योगपतीला धमकावत होता. "तुला जेलमध्ये पाठवेन," अशी धमकी देऊन तो पैशांसाठी दबाव टाकत होता. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने उकळलेल्या पैशांचा वापर चैनीसाठी आणि मालमत्ता खरेदीसाठी केला आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच, या क्रिकेटपटूने आणखी कोणाला अशा प्रकारे जाळ्यात अडकवले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.