मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आता काही तासांत! प्रवास, वेळेसह तिकिटाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Mumbai-Konkan Ro-Ro: कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे!

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai-Konkan Ro-Ro: बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली.
मुंबई:

Mumbai-Konkan Ro-Ro: कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे! आता मुंबईहून कोकणात जाण्यासाठी तुम्हाला आता बोटीनंही प्रवास करता येणार आहेत. 'रो-रो' (Ro-Ro) सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग असा जलद प्रवास लवकरच सुरू होणार आहे. राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली.

ही सेवा येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, यामुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

प्रवासाला किती वेळ लागेल? 

  • ही रो-रो सेवा 'M-2-M' या नावाने ओळखली जाईल. ही बोट दक्षिण आशियातील सर्वात वेगवान बोट आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
  • मुंबई (भाऊचा धक्का) ते जयगड (रत्नागिरी): अवघे 3 ते 3.5 तास.
  • मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग): फक्त 5 ते 5.5 तास.
  • सध्या मुंबई ते अलिबाग जाणारी बोट 10 ते 15 नॉट वेगाने धावते, तर ही नवी बोट 25 नॉट वेगाने धावेल.

( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं? )

सेवेला परवानगी आणि सुरक्षा

या रो-रो सेवेसाठी केंद्रीय आणि राज्य बंदरे मंडळाने आवश्यक असलेली सर्व 147 परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, सध्याचे हवामान ढगाळ असल्यामुळे आणि समुद्र खवळलेला असल्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेवा सुरू करण्याची तारीख 1 किंवा 2 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ही सेवा कायमस्वरूपी असणार आहे.

बोटीतील सुविधा आणि जागा

ही बोट प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायी असणार आहे. यामध्ये विमानाप्रमाणेच चार वेगवेगळ्या श्रेणी उपलब्ध असतील.

  • फर्स्ट क्लास: 12 सिट्स
  • बिझनेस क्लास: 48 सिट्स
  • प्रीमियर इकोनॉमी: 44 सिट्स
  • इकोनॉमी: 552 सिट्स
  • या बोटीमधून 50 चारचाकी आणि 30 दुचाकी वाहने नेता येतील.

प्रवासाचे तिकीट आणि शुल्क

प्रवाशांसाठी आणि वाहनांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाईल.

  • प्रवाशांचे शुल्क:
  • इकोनॉमी क्लास: ₹2500
  • प्रीमियर इकोनॉमी: ₹4000
  • बिझनेस क्लास: ₹7500
  • फर्स्ट क्लास: ₹9000

वाहनांचे शुल्क

  • चारचाकी वाहन: ₹6000 (आकारानुसार दरात बदल होऊ शकतो)
  • दुचाकी वाहन: ₹1000
  • सायकल: ₹600
  • मिनिबस: ₹13000
  • 30-सिटर बस: ₹14500
  • 45-सिटर बस: ₹17000
  • 45-सिटरपेक्षा मोठी बस: ₹21000

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
या 'रो-रो' सेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय शिपिंग मंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित राहणार आहेत. 40 वर्षांनंतर कोकणच्या इतिहासात ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे हा कोकणवासीयांसाठी एक मोठा क्षण आहे, असं राणे यांनी यावेळी सांगितलं.