मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. लवकरच हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील दळणवळणाला अधिक गती मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महानगरातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरात विविध रस्त्यांवर उड्डाणपूल, रेल्वे मार्गावर उड्डाणपूल, पादचारी पूल, फ्लाय ओव्हरची उभारणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाने काही नवीन पुलांचे बांधकाम केले आहे तर आणखी काही पुलांच्या बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचा देखील समावेश आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकताच कर्नाक पूल प्रकल्पस्थळास भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर बांगर म्हणाले की, मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केलेल्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग (Connectivity) कायम ठेवण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर तर पूर्व बाजूला (पी डि'मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर इतकी आहे.
( नक्की वाचा : Eknath Shinde 'नालेसफाई 15 दिवसांमध्ये पूर्ण करा, अन्यथा...' उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा )
सद्यस्थितीत कर्नाक पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग (Solid Approach) पूर्ण झाले आहेत. पश्चिमेकडील डेक स्लॅबचे काम देखील पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील ८० पैकी ४० मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित ४० मीटर अंतरासाठी “अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट” चा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत क्युरिंग कालावधी पूर्ण होईल. रेल्वे हद्दीत अँटी क्रॅश बॅरियर्स बसवण्याची कामे सुरू आहेत. एकूणच पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे दिनांक १० जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर व कोणताही अवरोध नसेल त्यावेळी पुलाची ताकद, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी (Load Test) घेण्यात येईल,
तसेच, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी, विक्रोळी उड्डाणपूल प्रकल्पस्थळास भेट देत कामांचा आढावा घेतला. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारा उड्डाणपूल पूर्व - पश्चिम परिसरासाठी वरदान ठरणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.३१ मे २०२५ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.