Mumbai News: मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी पुढील आठवड्यात तीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये मेट्रो लाइन 2बी चेंबूर विस्तार, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड बीकेसी विस्तार आणि ठाणे-बोरीवली ट्विन टनल प्रकल्पासाठी 'टीबीएम अर्जुन'चे लाँचिंग समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे आणि बीकेसी (BKC) परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो लाइन 2बी चा चेंबूर विस्तार
मेट्रो मार्ग 2-ब च्या चेंबूरपर्यंतच्या विस्ताराचे काम पूर्ण झालंय. लवकरच तो खुला होण्याची शक्यता आहे. या नवीन मार्गामुळे डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास सुकर होईल. या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे चेंबूर मेट्रो स्टेशन, व्ही. एन. पुरव मार्गावरच्या मोनोरेल स्टेशनपासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. तसंच चेंबूर रेल्वे स्टेशनपासून मोनोरेल स्टेशन 200 मीटर अंतरावर आहे. यामुळे मेट्रो, मोनोरेल आणि हार्बर रेल्वे लाईन एकमेकांशी जोडल्या जातील. तेव्हा प्रवाशांना चेंबूर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी एक वेगवान आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.
(नक्की वाचा- लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)
ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प
बोरिवलीवरुन ठाण्याला किंवा ठाण्यावरुन बोरिवलीला फक्त 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. कारण ठाणे बोरिवली जुळ्या बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरु झालंय. या दुसऱ्या बोगद्यासाठी 'अर्जुन' या टनेल बोरिंग मशीनचं काम सुरु झालंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा हा मार्ग बोरिवली-घोडबंदर रस्त्याला जोडला जाईल. या बोगद्याचं खोदकाम सुमारे 17 महिने चालणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.
(नक्की वाचा- VIDEO: 'रामायणम्' सिनेमाचा दमदार ट्रेलर लॉन्च; प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील रणबीरपेक्षा रावणाचीच चर्चा)
एससीएलआर - बीकेसी विस्तार
1.4 किमी लांबीचा हा रस्ता असून, यामध्ये 500 मीटरचा 4-लेन उन्नत मार्ग आणि 900 मीटरचे 2-लेन रॅम्प्स समाविष्ट आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (वाकोला जंक्शन) ला थेट भारत नगर, वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडले जाईल. यामुळे कलानगरचा वळसा टाळता येईल आणि वाकोला परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.