कारचा मागील टायर गणेशच्या छातीवर होतं. तो त्रासानं ओरडत होता आणि पाणी मागत होता. मी पाणी आणायला गेलो आणि कारवाले फरार झाले. मुंबईमध्ये हिट अँड रनचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. वर्सोवा बीचवर झोपलेल्या गणेश यादवला कारनं चिरडलं. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गणेश जवळच झोपलेला बबलू श्रीवास्तव जखमी झाला आहे. तो या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आहे. बबलूनंच ही घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिल्यांदाच बीचवर झोपलो होतो...
ही कार वर्सोवा बीचवर आली त्यावेळी गणेश आणि बबलू तिथं झोपले होते. गणेश या अपघातामध्ये जखमी झालाय. त्यानं सांगितलं की, 'उष्ण हवामानामुळे आम्हाला घरी झोप येत नव्हती. त्यामुळे आम्ही वर्सोवा बीचवर येऊन झोपलो होतो. आम्ही कधीही बीचवर झोपत नाही. पहिल्यांदाच आम्ही इथं झोपलो. आम्ही रात्री 12 च्या सुमारास इथं झोपलो. आम्ही झोपलो त्यावेळी तिथं कधीही कोणती गाडी येत नाही. त्यामुळे असं काही घडेल याचा आम्ही विचारही केला नव्हता.
नेमकं काय घडलं?
बबलूनं सांगितलं, 'आम्ही कारला पुढं जाताना पाहिलं. थोड्या अंतरावर कार थांबली. त्यानंतर त्यांनी कार रिव्हर्स घेतली. कार रिव्हर्स घेताना मागं कुणी झोपलं आहे की नाही हे ड्रायव्हरनं पाहिलं नाही. कार रिव्हर्स झाल्यानंतर गणेशच्या छातीवर चढली. त्याच परिस्थितीमध्ये कार जवळपास 15 ते 20 सेकंद थांबली होती. त्याचवेळी कारचा मागील हिस्सा माझ्या डोक्याला लागला आणि मला दुखापत झाली. मी त्यामुळे काही काळासाठी बेशुद्ध पडलो.
( नक्की वाचा : महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश )
मी 2-3 मिनिटांनी शुद्धीवर आलो. त्यावेळी एक व्यक्ती कारमधून उतरल्याचं मी पाहिलं. पण, त्यानं आमची कोणतीही मदत केली नाही. त्यानंतर मी उठलो. गणेश तेंव्हा पाणी मागत होता. तो वेदनेनं ओरडत होता. मी पाणी आणायला गेलो. त्यावेळी कारमधील लोकं फरार झाले.
गणेश यादवच्या मोठ्या भावानं सांगितलं की, 'मी सकाळी बीचवर फिरायला आलो होतो. त्यावेळी तुझ्या भावाचा अपघात झाल्याचं एका दुकानदारानं मला सांगितलं. मी त्यावेळी पळक तिथं आलो. गणेशला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा श्वास सुरु नव्हता. मी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी तो मृत असल्याचं जाहीर केलं.'
( नक्की वाचा : विद्यार्थी आणि शिक्षिका चिडवत होत्या म्हणून कल्याणच्या मुलानं दिला जीव! चिठ्ठीत काय लिहिलं? )
पोलिसांकडून आरोपींना अटक
वर्सोवा पोलिसांनी कारमधील दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कार ड्रायव्हर आणि त्याच्या मित्राला काही तासांमध्ये अटक करण्यात आलीय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. निखिल जावळे (वय 34) आणि शुभम डोंगरे (वय 33) अशी आरोपींची नावं आहेत. अंधेरी कोर्टात त्यांना सादर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.