पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात येणार आहे. कलकत्ता उच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे.
कोलकातामध्ये डॉक्टरची बलात्कार करुन हत्या झाल्यानं संतापाचं वातावण आहे. संपूर्ण देशात याबाबत निदर्शनं सुरु आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टराचा मृतदेह सापडला होता. मृत डॉक्टरचे कपडे चुरगळलेले होते. तसंच संपूर्ण शरिरावर जखमा होत्या. या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनानं गंभीर चूक केली असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.
उच्च न्यायालयानं सरकारी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चांगलंच फटकारलं आहे. ते या घटनेनंतर सक्रीय नव्हते, हे निराशाजनक आहे, असं कोर्टानं स्पष्ट केलं. माजी प्राचार्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांमध्येच त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये तेच काम देण्यात आलं त्यावरही कोर्टानं नाराजी व्यक्त केली. त्यांना तातडीनं कर्तव्यावरुन दूर केलं जावं आणि सुट्टीवर पाठवावं असे आदेश कोर्टानं दिले.
( नक्की वाचा : बायको ओरडत होती, पण नवऱ्यानं ऐकलं नाही...बाईकला बांधून फरफटत नेलं ! Video Viral )
प्रशासन पीडित परिवारासोबत आहे, असं दिसत नाही, असं कोर्टानं सांगितलं. 'हे एक विशेष प्रकरण आहे. आता वेळ वाया घालवणे शक्य नाही. पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. या खटल्याची डायरी आज संध्याकाळीच केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवावी. तसंच बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना सर्व कागदपत्रं द्यावी, असे आदेश कोर्टानं कोलकाता पोलिसांना दिले.
या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी संप मागं घ्यावा. त्यांच्यावर उपचार करण्याची पवित्र जबाबदारी आहे, असं आवाहनही कोर्टानं यावेळी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world