Mumbai Water Crisis News: टँकर चालक संपामुळे मुंबईमध्ये सध्या ओढावलेल्या पाणीबाणी समस्येमुळे सर्वांचे हालहाल होत आहेत. ही समस्या लवकर सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. टँकर चालकांचा संप मागे न घेतल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिका आता शहरातील विहिरी, बोअरवेल आणि खासगी पाण्याचे टँकर नियंत्रणात घेऊन स्वतःच पाणीपुरवठा करणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता कसा होणार पाणीपुरवठा?
- मुंबई महापालिकेने एक योजना (SOP) तयार केली आहे.
- प्रत्येक टँकरमागे किती लोक असतील, पाणी कुठून येईल आणि पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल? हे सर्वकाही निश्चित करण्यात आलंय.
- टँकरची मागणी करणाऱ्या सोसायटीला जवळपासच्या सीएफसी सेंटरमध्ये अर्ज करावा लागेल आणि शुल्क भरावे लागेल.
- पाणीपुरवठ्यानंतर टँकर मालकाला पावती दाखवून रक्कम मिळेल.
- पोलिसांच्या मदतीने संपूर्ण ऑपरेशन पार पडेल.
- प्रत्येक टँकरला पोलीस सुरक्षा पुरवली जाईल.
- मुंबई पोलीस, वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिका एकत्रित हे काम करतील.
- आवश्यकता भासल्यास स्थानिक अधिकारी देखील योजनेमध्ये काही बदल करू शकतात.
(नक्की वाचा: Water Tanker Strike : मुंबईत टँकर चालक संपावर का गेलेत? नेमका विषय काय?)
संप का पुकारण्यात आलाय?
- केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमांविरोधात नाराज झालेल्या टँकर चालकांनी संप पुकारलाय.
- बीएमसीने सध्या तरी या नियमांशी संबंधित नोटिशीला 15 जून 2025 पर्यंत स्थगिती दिलीय.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर उपाय शोधण्याचे तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.
(नक्की वाचा: Mumbai Water Crisis : मुंबईकरांना 3 दिवसांपासून हक्काचं पाणी नाही! आर्थिक राजधानीची ही अवस्था का झाली?)
पाण्यासाठी किती होणार खर्च?
मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या दरांसह 25 टक्के प्रशासन शुल्क जोडून सोसायटीला पैसे द्यावे लागतील. लेखा अधिकारी खर्चाची संपूर्ण माहिती देतील.
Mumbai water crisis| मुंबईत टँकर चालकांचा संप, नागरिक त्रस्त; काय आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया?