Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढली, पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा घटला, पाहा आकडेवारी

Mumbai Lakes Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा घटून 49.73 टक्क्यांवर आल्यामुळे मुंबईत सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात सध्या तरी कायम राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: गेल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पाणीटंचाईतून सुटका होईल आणि पालिकेकडून सुरू असलेली पाणीकपात रद्द केली जाईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तलाव क्षेत्रात पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत तब्बल 111 दशलक्ष लिटर्सची घट झाली आहे. या घटलेल्या पाणीसाठ्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याची चिन्हे तूर्तास मावळली आहेत.

धरणातील पाणीसाठ्याची ताजी आकडेवारी

मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठा वाढून 49.93 टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला असून तो आता थेट 49.73 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')

तलावांमधील पाणी साठ्यातील बदल

  • 13 जुलै: तलावांमध्ये एकूण 7 लाख 22 हजार 649 दशलक्ष लिटर इतका साठा उपलब्ध होता.
  • 14 जुलै: हा साठा घटून 7 लाख 22 हजार 538 दशलक्ष लिटरवर आला आहे.
  • एकूण घट: अवघ्या 24 तासांत तब्बल 111 दशलक्ष लिटर पाणी कमी झाले आहे.

यामध्ये प्रामुख्याने तानसा, मोडक सागर आणि विहार तलावांमधील पाणीसाठ्यात तब्बल 60 हजार दशलक्ष लिटर्सची मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

पाऊस पडणे आवश्यक; अन्यथा पाणीकपात कायम

मुंबईकरांना वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी धरणांमध्ये संपूर्ण साठा जमा होणे आवश्यक आहे. सध्या धरणांमध्ये केवळ 49.73 टक्केच पाणी शिल्लक आहे, जे निम्म्यापेक्षा कमी आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या मते, तलाव क्षेत्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणे अत्यंत आवश्यक आहे. जर पुढील काही दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर मुंबईत लागू असलेली 10 टक्के पाणीकपात सध्या तरी रद्द करणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
 


Topics mentioned in this article