Mumbai News : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमधील पाणी पातळी आणि यंदाच्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. जल अभियंता विभागाने 12 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, यावर्षी झालेला पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे एकूण पाणीसाठ्यातही थोडी घट झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, अजूनही तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
मोठ्या तलावांमध्ये पावसाची घट
यावर्षी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मिडल वैतरणा आणि भातसा यांसारख्या मोठ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
- अप्पर वैतरणा - यावर्षी 1430 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 1722 मिमी होता.
- मोडक सागर - यावर्षी 2139 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 2443 मिमी होता.
- तानसा - यावर्षी 2019 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 2153 मिमी होता.
- मध्य वैतरणा - यावर्षी 1583 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 1999 मिमी होता.
- भातसा - यावर्षी 1990 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 2146 मिमी होता.
(नक्की वाचा- कल्याण-शिळफाटा मार्गावरील 11 ते 31 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग?)
विहार आणि तुळशी तलावांत समाधानकारक पाऊस
याउलट, विहार आणि तुळशी या दोन तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. विहार तलावात यावर्षी 2720 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 2400 मिमी होता. तर तुळशी तलावात यावर्षी 3309 मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी 3263 मिमी होता.
एकूण पाणीसाठा आणि धरण व्यवस्थापन
अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 2025 मध्ये 89.20 टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा 92.55 टक्के होता. पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोडक सागर आणि तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भातसा धरणाचे दरवाजे 02 ऑगस्ट पासून बंद करण्यात आले आहेत. तसेच, अप्पर वैतरणा तलावातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.