Mumbai Water Level: मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
शनिवार सकाळी 6 ते रविवार, 19 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या 24 तासांतील पावसामुळे मुंबईचा एकूण उपयुक्त पाणीसाठा आता तब्बल 7,58,245 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. हा साठा तलावांच्या एकूण साठवणूक क्षमतेच्या 52.39 टक्के इतका असून गेल्या अवघ्या 24 तासांत त्यात 1.62 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. मात्र ही टक्केवारी अजूनही समाधानकारन नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने रविवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने समाधानकारक पाणी जमा होत असून हा वेग कायम राहिल्यास मुंबईत लागू असलेली पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
विहार आणि तुळशी तलाव तुडुंब
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे मुख्य दोन तलाव जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ओसंडून वाहू लागले आहेत. विहार तलाव हा 7 जुलैपासून पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के भरून वाहत आहे. त्यानंतर त्याच दिवशी तुळशी तलाव देखील ओसंडून वाहू लागल्याने त्याचा साठा सध्या 98.33 टक्क्यांवर पोहोचला आहे.
याशिवाय, पाणी शुद्धीकरण केंद्र असलेल्या भांडुप संकुल परिसरात गेल्या 24 तासांत 45 मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पर्जन्यमान आता 1,818 मिमीवर पोहोचले आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसांतही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असल्याने इतर प्रमुख धरणांमधील साठ्यातही वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या तलावात सध्या किती पाणीसाठा?
- अप्पर वैतरणा - 72,209 (31.80%)
- मोडक सागर - 1,02,000 (79.12%)
- तानसा- 1,22,404 (84.37%)
- मध्य वैतरणा- 90,528 (46.78%)
- भातासा - 3,35,495 (46.79%)
- विहार- 27,698 (100%)
- तुळशी - 8,046 (98.33%)