Dahisar Toll Naka Traffic: दहिसरचा टोल नाका दुसरीकडे हलवा! प्रताप सरनाईक यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

Pratap Sarnaik on Dahisar Toll Naka: सद्यस्थितीत असलेला टोल नाका मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतच येतो. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेला दहिसर टोल नाका (Dahisar Toll Naka) हलवण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. हा टोल नाका शहराच्या आत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जाते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा टोल नाका 2 किलोमीटर पुढे हलवावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.

( नक्की वाचा: कुठेही, कितीही वेळा फिरा; फक्त 100 रुपयांत! गणेशोत्सवापूर्वी पुणे मेट्रोची भन्नाट योजना )

सरनाईक यांच्या मागणीमागील कारण काय?

सरनाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दहिसर टोल नाक्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील सुमारे 15 लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाढतो आणि इंधनाचा अनावश्यक अपव्यय होतो. वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचीही हानी होते.

टोलनाका 2 किमी पुढे नेण्याची मागणी

सद्यस्थितीत असलेला टोल नाका मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतच येतो. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम होतो. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका 2 किलोमीटर पुढे, वेस्टर्न हॉटेलसमोर (Western Hotel) स्थलांतरित करावा, असे सरनाईक यांनी सुचवले आहे. यामुळे मीरा-भाईंदर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल.

( नक्की वाचा: राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय )

टोलनाक्यावर लहान वाहनांना टोलमाफी

सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीही अनेक टोलनाके रद्द केले असून, लहान वाहनांना टोल माफी दिली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. आता ही नवी मागणी मान्य झाल्यास स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

( नक्की वाचा: कल्याण-शिळफाटा मार्गावरील 11 ते 31 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग? )