Pune News: 'पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद', मुस्लिम बांधवांनी का दिल्या घोषणा? पुण्यात काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि देशभक्तीचा संदेश देणारी एक वेगळी घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Muslim People News
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune News Today : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि देशभक्तीचा संदेश देणारी एक वेगळी घटना समोर आली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी शहरातून फेरी काढत “पाकिस्तान मुर्दाबाद” आणि “हिंदुस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून शहरात या फेरीची चर्चा रंगली आहे.
मंचर शहरातील मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजातील काही युवक आणि नागरिकांनी एकत्र येत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फेरी काढली.या वेळी देशभक्तीपर घोषणा देत भारताबद्दलची आपली भूमिका व्यक्त करण्यात आली काही युवकांच्या हातात विविध पोस्टर्सही असल्याचे दिसून आले.

रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो.या काळात उपवास,प्रार्थना आणि समाजात शांतता व सलोखा राखण्याचा संदेश दिला जातो.त्याच पार्श्वभूमीवर मंचरमध्ये काढण्यात आलेल्या या फेरीकडे अनेकांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले आहे.दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून मंचर शहर विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. शहरातील एका दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा काही हिंदुत्त्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता. त्यानंतर हा विषय राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेत आला.

Advertisement

नक्की वाचा >> Dombivali News : डोंबिवलीच्या 'या' शाळेत 38 टक्के फी वाढ, विद्यार्थी-पालकांना धमकावलं, मनसेनं दिला मोठा इशारा

मंचर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही

याच पार्श्वभूमीवर तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंचरमधील पांडवकालीन बारव परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती.या घटनांमुळे शहरातील वातावरणाबाबत काही ठिकाणी चिंता व्यक्त केली जात होती आणि दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र या सर्व घडामोडींनंतरही मंचर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनानेही विशेष दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे.

नक्की वाचा >> Crime News : पतीला  बस स्टँडला भजी आणायला पाठवलं अन् नव्या नवरीनं केलं भयानक कांड

दरम्यान,या फेरीदरम्यान काही ठिकाणी इस्रायलमधील अल-अक्सा मशिदीच्या संदर्भातही निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलमधील अल-अक्सा मशीद मुस्लिम बांधवांच्या ताब्यात राहावी,अशी मागणी काही सहभागींकडून करण्यात आली.सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा मांडण्यात आल्याचे बोलले जात आहे.अशा पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी काढलेली ही फेरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

या फेरीतून नेमका कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नसली, तरीही सामाजिक सलोखा आणि देशाबद्दलची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे काही नागरिकांचे मत आहे.सध्या मंचर शहरात शांततेचे वातावरण कायम असून नागरिकांनीही संयम राखत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात घडलेली ही घटना परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे.

Topics mentioned in this article