संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur Shocking Video Viral : पंढरपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीतीचं सावट पसरलं आहे. पंढरपूरात आज दिवसभरात दोन वेळा मोठा गूढ आवाज आला. हा आवाज मागील चार दिवसांपासून येत असल्याची माहिती आहे. हा आवाज नेमका कसला आहे? कशामुळे हा आवाज आला? याबाबतचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. या आवाजामुळे पंढरपूर शहरासह उपनगरातीलही काही भाग हादरून गेला आहे. शहरात काहीतरी आक्रित घडणार का? अशा भीतीच्या छायेत पंढरपूरकर असल्याचं सांगितलं जात आहे.
पंढरपूरमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमध्ये आज सकाळी 10.15 आणि दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास गुढ असा मोठा आवाज झाला. एखाद्या स्फोटाप्रमाणे असणारा आवाज पंढरपूरकरांना काही क्षणासाठी भयभीत करून गेला. या आवाजामुळे घराच्या काचा तसेच झोपडपट्टी परिसरात भांडीही कडाडली असल्याचे बोलले जात आहे.पंढरपुरात आलेले भाविक देखील या आवाजामुळे काही काळ घाबरले होते. या आवाजामुळे साहजिकच अनेकांना भूकंप झाल्याचा आभास झाला. त्यामुळे पंढरपूर मध्ये आलेला आवाज हा नक्की कशाचा होता? याबाबत चर्चा सुरु आहे.
नक्की वाचा >> Hyundai च्या 'या' 4 गाड्यांचा विषयच हार्ड, 2026 मध्ये मार्केट करणार जाम, लुक, परफॉरमन्स अन् जबरदस्त मायलेज
पंढरपूर स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून तपास सुरु
गुढ आवाजाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता पंढरपूर स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांच्यामार्फत या आवाजाचा शोध सुरू आहे. नक्की हा आवाज भूगर्भातील काही बदलांमुळे आला आहे का ? किंवा आसपासच्या परिसरात नक्की कुठे काय झाले? भूकंप सदृश्य परिस्थिती झाली का ?याचं संशोधन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक प्रशासन करत असून लवकरच याबाबतचा उलगडा केला जाणार आहे.