Nagpur News: नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेत तब्बल 800 विद्यार्थी 3 ते 4 फूट पाण्यात अडकले होते. अचानक तुंबलेल्या पाण्याने शाळेला पाण्याचा वेढा पडला आणि चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला. प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि महापालिकेच्या कारभाराचा फटका अखेर निष्पाप विद्यार्थ्यांना बसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
दोरीच्या मदतीने पालकांनी उभारली मानवी साखळी
शाळेच्या आवारात आणि मुख्य रस्त्यावर पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की तिथे पाय टिकवणेही कठीण झाले होते. पाण्याचा वेढा वाढू लागल्याने चिमुकले घाबरले. अखेर अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पालकांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली.
मुख्य रस्त्यापासून शाळेच्या इमारतीपर्यंत दोरी बांधून मानवी साखळी तयार करण्यात आली आणि पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.

हा अत्यंत गंभीर प्रकार नागपूरमधील खामला आणि निकालास परिसरातील प्रसिद्ध सोमलवार शाळेत घडला. ऐन पावसाळ्यात रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम आणि तिथे पडलेला मोठा खड्डा यामुळेच पाणी तुंबल्याचा आरोप होत आहे. शाळेचे प्राचार्य दामोदर ठोंबरे यांनी नागपूर महानगरपालिका आणि कंत्राटदाराला या परिस्थितीसाठी थेट जबाबदार धरले आहे.
( नक्की वाचा : Ambernath : अंबरनाथ-उल्हासनगर प्रवासादरम्यान प्रवाशांचा जीव टांगणीला; गार्डच्या नजरेने टळला मोठा रेल्वे अपघात )
प्राचार्यांनी 14 तारखेलाच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून प्रवेशद्वारावरील अर्धवट कामामुळे मोठा अपघात होऊ शकतो असा इशारा दिला होता. मात्र 14 दिवस उलटूनही प्रशासनाला जाग आली नाही.
मोठी दुर्घटना टळली; उद्या शाळेला सुट्टी
पालक आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे 800 विद्यार्थ्यांना वेळेवर सुखरूप बाहेर काढता आले आणि एक मोठी दुर्घटना टळली. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (बुधवार 29 जुलै 2026) शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world