Nagpur News: रीलच्या नादात जेल; एका डायलॉगमुळे तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nagpur Crime News: नागपूरमध्ये पोलिसांना कमी लेखणारी आणि स्वतःला पोलीस कमिशनर समजणारी डायलॉगबाजीची रील बनवणे तीन तरुणांना महागात पडले आहे. तहसील पोलिसांनी या तिन्ही रील स्टार्सना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लाईक्स-व्ह्यूजच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रील स्टार्सवर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इंस्टाग्रामवर रील बनवून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि पोलिसांना कमी लेखण्याचा प्रयत्न नागपूरच्या तीन तरुणांच्या अंगलट आला आहे. या डायलॉगबाज रील स्टार्सना नागपूरच्या तहसील पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून, तिघांनाही अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

"शहर के कमिशनर तो हम ही लोग है"

हे संपूर्ण प्रकरण नागपूरमधील असून, या तीन तरुणांनी सुमारे वर्षभरापूर्वी एक स्टाईलबाज रील चित्रित केली होती. या रीलमधील डायलॉगबाजी अशी होती, "पोलीस चौकी के हिसाब से शहर बाट रहे हो सुलतान, चौक चाहे पोलीस की हो.. शहर के कमिशनर तो हम ही लोग है..."

Advertisement

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. डिजिटल माध्यमातून अशा प्रकारे कायदा व सुव्यवस्था तसेच थेट पोलीस यंत्रणेला आव्हान देणारे वक्तव्य पसरवल्यामुळे समाजात असंतोष निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सलोखा बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. नागपूरच्या तहसील पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि या तिन्ही रील स्टार्सच्या मुसक्या आवळल्या.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

माफी मागण्याची आली वेळ; तिघांची नावे जाहीर

पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच, हवेत उडणाऱ्या या रील स्टार्सची सर्व डायलॉगबाजी हवेतच विरली. काही वेळातच या तरुणांचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते पोलिसांसमोर कानाला हात लावून आणि उठबस करून माफी मागताना दिसत आहेत. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  1. शाहिद अफजल शकील खान (वय 26 वर्षे)
  2. मोहम्मद साहिल मोहम्मद शकील शेख (वय 24 वर्षे)
  3. रिजवान मोहम्मद अजीज (वय 28 वर्षे)


तहसील पोलिसांनी या तिघांवर समाजात पोलीस विभागाची प्रतिमा डागाळणे आणि चुकीचे संदेश पसरवणे या अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 
 


Topics mentioned in this article