Nagpur News: शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळला अन् मृत्यू; नागपुरातील मन सुन्न करणारी घटना

नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी शाळेत मधल्या सुट्टीत मित्रांसोबत पळताना 8 वर्षांचा मुलगा अचानक खाली कोसळला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना घडली आहे. दुपारी मधल्या सुट्टीच्या वेळी मित्रांसोबत वर्गाबाहेर पळत असताना तिसऱ्या वर्गात शिकणारा अवघ्या आठ वर्षांचा मुलगा अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. समता नगर येथील रहिवासी असलेला फनित कटरे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे शाळा परिसर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांवर मोठा शोककळा पसरली आहे.

नक्की काय घडले?

पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी फनितच्या आईने त्याला नेहमीप्रमाणे शाळेत सोडले होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास लंच ब्रेक झाल्यानंतर फनित आपल्या वर्गमित्रांसह वर्गखोलीबाहेर आला आणि व्हरांड्यात पळू लागला. अवघे थोडे अंतर पार केल्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी तातडीने फनितला मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Advertisement

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

पालकांचा संताप; शाळा प्रशासनाचे स्पष्टीकरण

या दुर्दैवी घटनेनंतर शाळेतील इतर पालकांनी सुरक्षा आणि देखरेखीच्या मुद्द्यावरून शाळा व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. मधल्या सुट्टीच्या वेळी मुलांवर योग्य देखरेख ठेवली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला. दुसरीकडे, शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

फनितला कोणीही ढकलले किंवा मारहाण केलेली नाही, तो पळत असताना अचानक स्वतःहूनच खाली कोसळल्याचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे प्रशासनाने सांगितले. पोलिसांनीही शाळेत भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.

(नक्की वाचा-  Salman Khan Backs CJP: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा CJP आंदोलनाला पाठिंबा! "पेपर लीक हा गंभीर विषय, पण...")

पोस्टमार्टमनंतर मृत्यूचं कारण होईल स्पष्ट 

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मुलगा अचानक धावताना कोसळल्याचे दिसत असले, तरी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हृदयविकाराचा झटका की अन्य काही वैद्यकीय कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 


Topics mentioned in this article