Nagpur News: नागपुरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सोशल मीडियावरील 19 वर्षीय इन्स्टाग्राम फ्रेंडने अवघ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 24 तास ओलीस ठेवून तिचा अतोनात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि फिल्मी स्टाईलने दार तोडून या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावरील आभासी मैत्री आणि ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकून एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीबाबत भीषण प्रसंग घडला आहे. ठाण्यातील एका सुप्रसिद्ध डॉक्टरचा मुलगा आणि सुशिक्षित कुटुंबातील असलेल्या या 19 वर्षीय तरुणाने स्वतःचे नाव 'आकाश मेहरा' असे खोटे सांगून या मुलीशी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर ओळख वाढवली होती.
आरोपीनं हळूहळू तिच्या मोबाईलचे 'पॅरेंटल कंट्रोल'ही आपल्या हातात घेत त्याने तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. 1 ऑगस्ट रोजी नागपुरात दाखल झालेल्या या नराधमाने दिघोरी परिसरात एका ॲपच्या माध्यमातून भाड्याने रूम घेतली आणि तिथूनच या अमानुष कटाची सुरुवात झाली.
( नक्की वाचा : Akola News: 'मला इथून घेऊन जा...',फोनवर रडली अन् काही मिनिटांतच सगळं संपलं; अकोल्यातील धक्कादायक घटना )
पालकांची पोलिसांत धाव आणि वेगाने तपास
रविवारच्या सकाळी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरून निघालेली 12 मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी जेव्हा 20 तासांपेक्षा जास्त वेळ घरी परतली नाही आणि तिचा फोनही बंद आला, तेव्हा तिच्या पालकांनी तत्काळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. मुलीच्या वडिलांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि नागपूर पोलिसांनी तात्काळ फिरवलेली तपासाची चक्रे यामुळे या मोठ्या गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली.
कसा लागला आरोपीचा शोध?
पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवत पीडितेच्या घरच्या लँडलाईनवर आलेल्या एका संशयास्पद फोनचा आणि तिच्या इन्स्टाग्राम चॅटचा तांत्रिक अभ्यास केला. सायबर टीमने आरोपीचा ठाण्यातील पत्ता आणि त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. नागपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधून आरोपीच्या आईमार्फत त्याला फोन लावण्यास सांगितला.
तो फोन जोडला जाताच सायबर तज्ज्ञांनी नागपुरातील दिघोरी परिसरातील त्याचे अचूक लोकेशन ट्रेस केले. पोलिसांना लोकेशन मिळाल्याचे समजताच आरोपी प्रचंड घाबरला. त्याच वेळी त्याने ऑनलाईन फूड डिलिव्हरी मागवली होती. पोलिसांनी पार्सल घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयची मदत घेतली आणि त्या फ्लॅटचा नेमका दरवाजा गाठला.
दार तोडून सुटका आणि अमानुष छळ
पोलिसांनी जेव्हा फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून अनुभवी पोलीसही हादरले. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीचे हात बेडच्या रेलिंगला बांधले होते आणि तिच्या गळ्यावर थेट चाकू ठेवला होता. मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीला झेप घेत पकडण्यात आले आणि मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली.
या 24 तासांच्या काळात आरोपीने मुलीचा अमानुष छळ केला होता. तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार करण्यात आले होते, तसेच धातूचे खिळे असलेल्या लेदरच्या पट्ट्याने तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. तिच्यावर विकृत लैंगिक अत्याचार करत त्याने याचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेलही केले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून ऑनलाईन खरेदी केलेले सेक्स टॉईज, हॅण्डकफ्स, लेदरचे पट्टे आणि नागपुरातून खरेदी केलेले चाकू जप्त केले आहेत.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले )
न्यायालयीन कारवाई आणि पोलीस तपास
घटनेनंतर पीडित तरुणीला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती सध्या तीव्र मानसिक धक्क्यात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून DNA नमुने, फिंगरप्रिंट्स आणि सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ताब्यात घेतले आहेत. नागपूरच्या विशेष POCSO न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूरमधील झोन 4 च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली.
आरोपी BBA चा विद्यार्थी असून, त्याने एखादा चित्रपट किंवा वेब सीरिजवरून प्रेरित होऊन हे कृत्य केले की त्याची मानसिक स्थिती बिघडली आहे, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.