Nagpur News: नागपुरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून या उदयोन्मुख खेळाडूने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
क्रिकेटमधील अपयश अन् नैराश्याचा ताण
मूळची अकोला येथील असणारी 17 वर्षीय अदिती मोरेश्वर चौकांडे ही गेल्या 2 वर्षांपासून तिच्या आईसोबत नागपुरात राहत होती. ती शहरातील सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे कसून धडे घेत होती आणि कठोर सराव करत होती. मोठ्या पातळीवर क्रिकेट खेळून नाव कमवण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा भाऊसुद्धा एक क्रिकेट खेळाडू आहे.
अलीकडेच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघ निवडीत आपले नाव न आल्याने ती प्रचंड निराश झाली होती. याच अपयशाच्या मानसिक तणावातून तिने लक्ष्मीनगर परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या उमालक्ष्मी अपार्टमेंटमधील राहत्या घरी चौथ्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केली.
( नक्की वाचा : Pune News: कास पठाराची हवा पुण्याच्या पोलिसांना भारी पडली! तपासाच्या नावाखाली केला भलताच पराक्रम )
ते 4 शब्द अन् पोलिसांची कारवाई
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना तपासादरम्यान एक भावूक सुसाइड नोट सापडली आहे. "माझी निवड झाली नाही..." असे अवघे 4 शब्द या चिठ्ठीत लिहिले असून, त्यातून तिचे अपयशाचे दुःख आणि मानसिक वेदना स्पष्टपणे समोर आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच बजाज नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व बाजूने सखोल तपास सुरू केला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येच्या सर्व कारणांचा अधिक खुलासा होईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |