Pune News: तपासाच्या बहाण्याने पुण्यातून बाहेर पडलेल्या पोलिसांच्या एका पथकाने खाकीचा असा काही गैरवापर केला की, थेट पोलीस आयुक्तालयानेच त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्यात गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) तिघांनी तपासाऐवजी थेट कास पठार गाठत पर्यटनाचा आनंद लुटल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या तिन्ही पोलिसांची 2 वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची मोठी कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
4 एप्रिल 2026 रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस शिपाई कोमल कांबळे हे तिघे एका गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्याला गेले होते. त्यांच्यासोबत या प्रकरणातील महिला फिर्यादी देखील होत्या. मात्र, साताऱ्यात पोहोचल्यानंतर मूळ गुन्ह्याचा ठोस तपास करण्याऐवजी या पथकाने केवळ मोघम कामे उरकली आणि उर्वरित वेळ पर्यटनस्थळांवर फिरण्यात घालवला, असे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले.
विभागीय चौकशीच्या अहवालानुसार, साताऱ्यात पोहोचल्यानंतर नियमानुसार सर्वप्रथम तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तपास करणे आवश्यक होते. परंतु, या अधिकाऱ्यांनी ते न करता आधी एका ढाब्यावर जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी सुमारे 3.15 वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून केवळ नावाला घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यानंतर परिसरातील कोणत्याही नागरिकाची किंवा प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आली नाही.
( नक्की वाचा : Chandrapur News: ससे आणि उंदरांमुळे फुटला कालवा? सिंचन विभागाच्या अजब अहवालाने उडाली खळबळ )
तपास अर्धवट सोडल्यानंतर तात्काळ पुण्यात परतणे गरजेचे असताना, या पथकाने साताऱ्याजवळील जगप्रसिद्ध कास पठारासह इतर प्रेक्षणीय स्थळे गाठली. सोबत असलेल्या महिला फिर्यादीची आई घरी आजारी आणि एकटी असल्याने त्यांनी लवकरात लवकर पुण्याला परतण्याची वारंवार विनंती केली होती. मात्र, पोलिसांच्या पथकाने या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद लुटला.
महिला फिर्यादीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
पुण्यात मध्यरात्री सुमारे 1 वाजता परतल्यानंतर या पथकाने महिला फिर्यादीच्या सुरक्षेचीही काळजी घेतली नाही. मध्यरात्रीच्या वेळी महिला फिर्यादीला सुरक्षितपणे तिच्या घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असताना, सुरुवातीला तिला थेट स्वारगेट बसस्थानकावर सोडून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. फिर्यादीने विनंती केल्यानंतर तिला शनिवार पेठ पोलीस चौकीत सोडण्यात आले.
याशिवाय, प्रकरणातील पोलीस हवालदार श्रीहरी पाटील यांच्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. तपासाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता कोणतेही अधिकृत कारण नसताना ते बेकायदेशीरपणे महिला फिर्यादीच्या घरी गेले होते, असेही चौकशीत उघड झाले आहे.
( नक्की वाचा : Pune News : कोर्टातून निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग; पुण्यात आंदेकर टोळीवर हल्ल्याचा भयंकर कट उघड )
अप्पर पोलीस आयुक्तांचा दणका
विभागीय चौकशीत या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात प्रचंड बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दाखविल्याचे सिद्ध झाले. या गैरवर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस शिपाई कोमल कांबळे या तिघांचीही पुढील 2 वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world