Shocking: अजब पोलीसांचा गजब तर्क!'गाडीत डिझेल नाही, हरवलेल्या मुलीला शोधता येणार नाही' कुटुंबीयांचा संताप

"साहेब, आमची तरुण मुलगी बेपत्ता झाली आहे, प्लीज तिला शोधा..." एका हतबल कुटुंबाला खाकी वर्दीकडून जे उत्तर मिळाले त्याने ते हादरले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

प्रवीण मुधोळकर 

उपराजधानी नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्या पेक्षा ही धक्कादायक घटना पुढे घडली. या प्रकरणात पोलिसांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हवालदील झालेल्या कुटुंबीयांनी तातडीने पाचपावली पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांकडून "आमच्या गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही," असे उत्तर देण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

एकीकडे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावर मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र यंत्रणेचा सावळागोंधळ उघड झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतरचा प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा संवेदनशील परिस्थितीत पोलिसांकडून तातडीने पावले उचलणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी केवळ गाडीत इंधन नसल्याचे तांत्रिक कारण पुढे केले नाही, तर "मुलगी 21 वर्षांची आहे, ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते, तिला जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकते," असे बेजबाबदार वक्तव्य करून प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 'या' तारखेला मतदान, तर मतमोजणी...

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "हा केवळ एखाद्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा नसून, संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे. जर पोलिसांकडे गस्त घालण्यासाठी आणि तपासासाठी मूलभूत सुविधाच नसतील, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी कोणाकडे दाद मागायची, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - Shocking Video: दादरमध्ये इडली बनवण्यासाठी शौचालयाचे पाणी? Video व्हायरल होताच मुंबईकरांमध्ये संतापाचा उद्रेक

दरम्यान कुटुंबीय आणि नागरिक आक्रमक झाले. त्यांनी पैसे गोळा केले. ते पैसे त्यांनी पोलीसांना दिले. जर तुमच्याकडे डिझेलला पैसे नसतील तर हे पैसे घ्या आणि मुलीला शोधा असं नागरिकांनी सांगितलं. या घटनेनंतर पोलीसांची एकच धावपळ उडाली. शेवटी या बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्यात पोलीसांना यश आलं आहे. असं नागपूर पोलीसांनी सांगितलं आहे. प्रेम प्रकरणातून ती एका मुलासोबत गेली होती असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र इंधन टंचाईचं भयाण वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे.