Nagpur News : डॉलरमध्ये तिकीट अन् विदेशी फंडिंग; RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा खळबळजनक खुलासा!

Nagpur RSS Headquarters Recce Probe: नागपूरमधील  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur RSS Headquarters Recce: या प्रकरणाची विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
नागपूर:

Nagpur RSS Headquarters Recce Probe: नागपूरमधील  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. या संपूर्ण कटासाठी कशा प्रकारे परदेशातून रसद पुरवण्यात आली आणि कशा पद्धतीने हालचाली करण्यात आल्या, याचा उलगडा आता कोर्टातील सुनावणी दरम्यान झाला आहे.

परदेशी चलनातून विमानाचे तिकीट बुक

या प्रकरणाची विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना इंडिगो एअरलाईन्सच्या तत्कालीन एअरपोर्ट मॅनेजर चारू वर्मा यांनी आपली साक्ष नोंदवली. या साक्षीमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. संशयित दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुल्ला शेख याला या कटासाठी मोठी विदेशी फंडिंग मिळाली होती. रईस शेखला नागपूरला पाठवण्यासाठी इंडिगो फ्लाईटचे पेमेंट भारतीय रुपयांऐवजी अमेरिकन डॉलरमध्ये करण्यात आले होते. यासाठी वर्डपे कार्डचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Advertisement

श्रीनगर ते नागपूर असा केला प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार, रईस शेख हा एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. तो 13 जुलै 2021 रोजी श्रीनगरहून मुंबईमार्गे नागपूरला पोहोचला होता. त्याने या संघटनेच्या सांगण्यावरूनच नागपूरमध्ये पाऊल ठेवले होते. नागपूरमध्ये आल्यानंतर त्याने संघाचे मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केली. आपले काम फत्ते केल्यानंतर 15 जुलै 2021 रोजी तो नागपूरहून दिल्लीमार्गे पुन्हा श्रीनगरला रवाना झाला होता.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'लिहून घ्या हेच येणार...' शिक्षिकेनं जे प्रश्न टिक केले तेच परीक्षेत आले, हादरवणारी माहिती )
 

कसे फुटले भांडे?

रईस शेखच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे आधीपासूनच लक्ष होते. सप्टेंबर 2021 मध्ये काश्मीर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या रईसने पोलिसांच्या कडक चौकशीनंतर नागपूरमधील रेकीचा संपूर्ण कट कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीमुळे यंत्रणांचे धाबे दणाणले होते. या कबुलीजवाबानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला काश्मीरमधून अटक केली आणि ट्रान्झिट रिमांडवर नागपूरला आणले.


( नक्की वाचा : Nagpur News : जेवणात विभूती आणि महाराजांकडे राहण्याची सक्ती, नागपूरच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूचे कारण उघड! )
 

रईस शेख सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याने आजवर अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केले आहेत, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्याच्याविरोधात असलेले ठोस पुरावे लक्षात घेता कोर्टाने त्याचे सर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात आता एअरलाईन्सच्या मॅनेजरची साक्ष सरकारी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 

Topics mentioned in this article