NEET Paper Leak: नीट-यूजी पेपर लीक प्रकरणातील धक्कादायक खुलासे सीबीआयच्या तपासातून समोर येत आहेत. जे सांगितलंय तेच परीक्षेत येईल असा आत्मविश्वास देणाऱ्या एका शिक्षिकेने खरंच पेपरमधील प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय आहे? सीबीआयच्या तपासात नेमकं काय आढळलं? याबाबतची नवी माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या शिक्षिकेला अटक आणि सीबीआयचा मोठा खुलासा
नीट-यूजी (NEET-UG) बायोलॉजी पेपर लीक प्रकरणात केंद्रीय तपास ब्युरो म्हणजेच सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून बॉटनी विषयाची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 9 झाली आहे.
मनीषा मांढरे ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नियुक्त करण्यात आली होती आणि तिने परीक्षा प्रक्रियेत काम करण्यास सुरुवात केली होती. तपासात समोर आले आहे की, एप्रिल महिन्यात मनीषाने पुण्यातीलच दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने अनेक नीट उमेदवारांशी संपर्क साधला. यानंतर तिने आपल्या घरीच या विद्यार्थ्यांसाठी खास कोचिंग क्लासेस सुरू केले होते.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बापानं लाखो खर्चून पेपर चोरला, पण पोरगा अभ्यासात ढ! नीट परीक्षेतील सर्वात मोठी 'कॉमेडी' उघड )
लिहून घ्या, हेच प्रश्न येणार; परीक्षेपूर्वीच प्रश्न दिले
सीबीआयच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कोचिंग दरम्यान मनीषाने विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजी या विषयांचे काही महत्त्वाचे प्रश्न नोट करून दिले होते. तिने विद्यार्थ्यांना हे प्रश्न त्यांच्या वहीत लिहायला आणि पाठ्यपुस्तकांमध्ये खास मार्क करायला सांगितले होते.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 3 मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट-यूजी परीक्षेत या शिक्षिकेने टिक केलेले बहुतांश प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आले होते. यावरून पेपर लीकचा हा कट किती सुनियोजित होता, हे स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )
देशभर छापेमारी आणि पुराव्यांची जप्ती
गेल्या 24 तासांमध्ये सीबीआयने देशभरातील 6 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या कारवाईत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे आता सविस्तर विश्लेषण केले जात आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 9 आरोपींचे जाळे दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर अशा वेगवेगळ्य शहरांमध्ये पसरलेले आहे. यातील 5 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुण्यातील दोन आरोपींना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.
कुलकर्णी आणि वाघमारे यांचा मुख्य सहभाग
या प्रकरणाचा मुख्य दुवा म्हणून पी. व्ही. कुलकर्णी याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा लेक्चरर असून एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी जोडलेला होता. त्याच्याकडे प्रश्नपत्रिकांचा थेट एक्सेस असल्याचा आरोप आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने मनीषा वाघमारेसोबत मिळून पुण्यातील त्याच्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग सत्र आयोजित केले होते. याच सत्रांमध्ये परीक्षेतील प्रश्न फोडण्यात आल्याचा सीबीआयचा संशय आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world