Nagpur News: आधी देवाला हात जोडले, कान धरून माफी मागितली अन्...; चोरांचा दानपेटीवर डल्ला, VIDEO व्हायरल

Nagpur Crime News: नागपूरमध्ये एका मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवाला हात जोडून आणि कान धरून माफी मागितल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

चोरी करताना पकडले जाण्याच्या किंवा देवाच्या कोपाच्या भीतीपोटी चोराने चोरीपूर्वी देवाची माफी मागितल्याची एक घटना नागपूरमधून समोर आली आहे. नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी नागपुरातील धंतोली परिसरातील एका मंदिरातही अशाच प्रकारे देवाची माफी मागून चोरी करण्यात आली होती. आता तशीच दुसरी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नक्की काय घडली घटना?

हे प्रकरण लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात असलेल्या शीतला माता मंदिर आणि शिव मंदिरातील आहे. मंदिराचे पुजारी आणि देखभाल करणारे जितेंद्र पांडे हे 27 जुलैच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून घरी गेले होते. 28 जुलैच्या सकाळी जेव्हा ते मंदिरात आले, तेव्हा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले आढळले. आत जाऊन पाहणी केली असता, शीतला माता मंदिरातील दोन्ही दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यातील संपूर्ण रोख रक्कम लांबवण्यात आली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: 'रामायणम्' सिनेमाचा दमदार ट्रेलर लॉन्च; प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील रणबीरपेक्षा रावणाचीच चर्चा)

देवाला हात जोडले अन् कान पकडले!

घटनेची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापनाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन अज्ञात चोर मंदिरात घुसताना स्पष्ट दिसत आहेत. चोरी करायला आलेल्या चोरांना देवाच्या घरात चोरी करण्याचे काहीसे भय होते. त्यामुळे चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवासमोर उभे राहून कान पकडले आणि हात जोडून माफी मागितली**. मात्र, माफी मागूनही त्यांचे मन बदलले नाही आणि त्यांनी दोन्ही दानपेट्या फोडून रोख रक्कमेवर हात साफ केला व पसार झाले.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू

तक्रारदार जितेंद्र पांडे यांच्या फिर्यादीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता मंदिरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयित चोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. देवाची माफी मागून चोरी करणाऱ्या या भामट्यांच्या मुसक्या पोलीस कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


Topics mentioned in this article