यंदाच्या नारळी पौर्णिमेच्या (8 ऑगस्ट) सुट्टीवरून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली असली, तरी हा आदेश वेळेत न मिळाल्याने अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरूच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, तर पालकांनी देखील यावरून संताप व्यक्त केला आहे.
सुट्टीचा आदेश आणि गोंधळाचे कारण
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 8 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती. दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द करून, त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दोन दिवसांसाठी सुट्टी घोषित करण्यात आली होती.
(नक्की वाचा- Narali Purnima 2025 Holiday: उद्या शाळा कॉलेजना सुट्टी? सरकारने दिली महत्त्वाची माहिती)
मात्र, हा आदेश खूप उशिरा जारी करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचे परिपत्रकही रात्री उशिरा निघाले, त्यामुळे शाळा-कॉलेजेसपर्यंत ही माहिती वेळेत पोहोचली नाही. अशात अनेकांना सुट्टी आहे की नाही, हे समजू शकले नाही. या गोंधळावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुट्ट्यांसारखे महत्त्वाचे निर्णय सरकारकडून वेळेत घेतले गेले पाहिजेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जर हा निर्णय काही दिवस आधी घेतला असता, तर विद्यार्थी आणि पालकांना वेळेवर माहिती मिळाली असती आणि हा संभ्रम टाळता आला असता, असंही विद्यार्थी पालकांचं म्हणणं आहे.
(नक्की वाचा- Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय?)
सरकारकडून आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार उपसचिव दिलीप देशपांडे यांनी जारी केला होता, आणि तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार तसेच विविध मंत्रालयांना पाठवला गेला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली नाही, असे दिसून येते. मात्र सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हा निर्णय वेळेत कळाल्याने त्यांनी मात्र सुट्टी घेतली आहे.