राहुल वाघ, नाशिक
प्रेमविवाह केल्यानंतरही 'जात' वेगळी असल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा छळ केल्याची अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिला न्याय मागण्यासाठी पोलिसांत पोहोचली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेचा 8 वेळा गर्भपात
पीडितेचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्न झाल्यापासूनच "तू आमच्या जातीची नाहीस" असे टोमणे तिला मारले जात होते. महिलेला दिवस गेल्याचे समजल्यानंतर सासूकडून “तू आमच्या जातीची नाहीस, तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही” असे सांगत गर्भपातासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. तसेच सासरच्या लोकांकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, या छळादरम्यान सासरच्या लोकांनी विवाहितेचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणला.
एवढेच नव्हे तर, पीडितेच्या तक्रारीनुसार, सासू-सासऱ्यांनी वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. “तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात अॅडमिट करू” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील नोकरी गेल्यानंतर महिला जुलै 2025 मध्ये नाशिकला आल्यानंतर छळ अधिक वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
(नक्की वाचा- Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)
पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी विजय महाजन (पती), निर्मला दशरथ महाजन (सासू), दशरत महाजन (सासरे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दागिने विकून पैसे हडपल्याचा आरोप
पीडितेने पोलिसांना सांगितले की, नाशिकमध्ये स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी तिच्या पतीने तिचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे घेतले होते. पैशांसाठी आणि हुंड्यासाठी देखील तिचा छळ केला जात होता. जात वेगळी असल्याने तिला सन्मानाने जगू दिले जात नव्हते. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.