Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या दिवशी काय काय होणार?

नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील.

जाहिरात
Read Time: 3 mins
नाशिक:

कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,  असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साधू-महंतांच्या उपास्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरूवात आहे, असे नमूद करू मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू -महंत करतात. राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू महंतांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. 2015 मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे असं ते म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?

गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचे उद्दिष्ट असून तसा शासनाचा प्रयत्न आहे. गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी उपायोजना करण्यात येत आहेत. गोदावरीत जाणारे पाणी स्वच्छ असावे यादृष्टीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी  निविदा काढण्यात येत आहेत. नदीपात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये असे प्रयत्न करण्यात येतील. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील, त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कुंभ आणि त्यानंतरही गोदावरीचे जल निर्मळ राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ट्रेंडिंग बातमी - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप

प्रास्ताविकात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान असणार आहे. तीन अमृत स्नानसोबत इतर पर्वस्नान होणार आहेत. कुंभमेळ्याची कामे वेगाने सुरू असून 4हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच 2 हजार 600 कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. ही सर्व कामे जानेवारी 2027 पूर्वी पूर्णत्वास येतील. या कामांसाठी सर्व आखाड्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा चांगला आणि सुरक्षित होईल. इथे येणाऱ्या साधू-महंतांना सुखद आणि पावन अनुभव येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नाशिक कुंभमेळा

  • सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026, दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी
  • (स्थळ-रामकुंड पंचवटी) 
  • प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027,आषाढ सोमवती अमावस्या.
  • महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027, श्रावण अमावस्या 
  • तृतीय अमृतस्नान-शनिवार 11 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध एकादशी

 
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

  • सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026, 
  • प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027, आषाढ सोमवती अमावस्या.
  • महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027, श्रावण अमावस्या 
  • तृतीय अमृतस्नान-शनिवार 12 सप्टेंबर 2027, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी). 

 
याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा 2027 मध्ये मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण 44 मुहूर्त असून त्रंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण 53 मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world