राहुल वाघ, नाशिक
Nashik News: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत (TCS) सुरू असलेल्या छळवणूक आणि धर्मांतर प्रकरणाने आता एक अत्यंत भयानक वळण घेतले आहे. हे प्रकरण केवळ कार्यालयीन छळवणुकीपुरते मर्यादित नसून, यात ह्यूमन ट्रॅफिकिंग म्हणजेच मानवी तस्करी आणि धर्मांतराचे एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत. तपासादरम्यान संशयित आरोपींच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'कॅटलॉगिंग' आणि कोड नंबर्सचे गुढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याच्या मोबाईल तपासणीत पोलिसांना काही गंभीर पुरावे मिळाले आहेत. दानिशच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे फोटो सापडले असून, प्रत्येक तरुणीला एक विशिष्ट 'कोड नंबर' देण्यात आला होता. तस्करांच्या टोळ्या ज्याप्रमाणे मालाची वर्गवारी करतात, त्याच धर्तीवर या तरुणींचे 'कॅटलॉगिंग' करण्यात आले असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोबाईलमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय ग्रुप्सचा समावेश असल्याचे दिसून आले असून, या तरुणींना परदेशात पाठवण्याचे नियोजन होते का, याचा तपास सुरू आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
फसवणुकीची पद्धत?
या टोळीची काम करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून किंवा मैत्री करून तरुणींचा विश्वास संपादन केला जायचा. एकदा तरुणी जाळ्यात अडकली की, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जायचा. तरुणींना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली जायची. या तरुणींना आंतरराष्ट्रीय टोळीमार्फत परदेशात विकले जात असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Shockingn News: माणुसकी संपली! पती रक्ताच्या थारोळ्यात, चालकाने पत्नीकडून साफ करवून घेतली अॅम्बुलन्स)
एसआयटीद्वारे सखोल तपास
या प्रकरणाची व्याप्ती पाहता, नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 एफआयआर दाखल झाले असून, दानिश शेखसह अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.