Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होणार असून २४ जुलै २०२८ पर्यंत हा सोहळा सुरू असेल अशी माहिती आहे. दरम्यान राज्य सरकारकडून कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. कोट्यवधींची विकासकामं हाती घेण्यात आली आहेत. परिणामी येथील जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळत आहे.
त्र्यंबकेश्वरमधील जमिनींचे भाव भिडले गगनाला...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर सध्या कुंभनगरी म्हणून ओळखलं जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची विकासकामं हाती घेण्यात आली आहेत. सुमारे २० हजार लोकसंख्या असलेल्या त्र्यंबकेश्वरचा कायापालट होत असल्याने येथील जमिनी, भूखंड, फार्महाऊस यासाठी मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे. स्थानिकांकडून आपल्याकडून जागेचा वापर भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी केला जात आहे. अनेक ठिकाणी निवासस्थान, हॉटेल उभं केलं जात आहे. स्थानिकांसह बाहेरील व्यक्ती येथे गुंतवणूक करताना दिसत आहे. त्र्यंबकेश्वर हे दोन डोंगराच्या मध्ये वसलेलं शहर आहे. येथील अनेक भाग नव्याने विकसित झाला आहे.
त्र्यंबकेश्वरमधील गुंतवणुकदारांनी बेजे, पहिणेसारख्या निसर्गरम्य भागात फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा विचार केल्याचं दिसतं. याशिवाय अनेक ठिकाणी योग केंद्र, निसर्गोपचार केंद्र पाहायला मिळतात. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन वर्षांपूर्वी १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा मिळणारी जमीन आता २५ ते ३० लाख गुंड्याने विकली जात आहे. हा आकडा थेट दुपटीहून जास्त आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.