- प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने वाद
- वनरक्षक माधवी जाधव यांनी मंत्री महाजन यांच्या भाषणातील बाबासाहेबांचा उल्लेख न केल्यावर तीव्र आक्षेप नोंदवला
- माधवी जाधव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिक इथं गोंधळ झाला होता. मंत्री गिरीश महाजान यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही. त्यावर वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवला. संविधान निर्माण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आपण पुसू देणार नाही. पालकमंत्र्यांनी मोठी चुक केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. मी काही झालं तरी माफी मागणार नाही. मला सस्पेंड केलं तरी चालेल. असं माधवी यांनी सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा व्हायरल झाला. त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट माधवी जाधव यांच्याशी संवाद साधला. त्यात खूप मोठे वक्तव्य माधवी यांनी केले आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
माधवी जाधव यांच्यासोबत संवाद साधल्याचा व्हिडीओ प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले आहेत की आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.
आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं प्रकाश आंबेडकर या पोस्टमध्ये म्हणत आहेत. यावेळी जो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे त्यात माधवी जाधव यांनी आपली भावना ही व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की मी जे केलं त्यानं माझं जिवन सार्थक झालं आहे. मी बाबासाहेब पुन्हा एकदा सर्वां पर्यंत पोहोचवलं. या पुढे तुमचं मार्गदर्श मला गरजेचं आहे. शिवाय मी अॅट्रोसिटीवर ठाम आहे असं ही त्या म्हणाल्या.
माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांचा निषेध करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची ही एन्ट्री झाली आहे. राज्यभरातून मिळणारा पाठिंबा पाहाता माधवी जाधव यांनी ही ठाम भूमीका घेतली आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात अॅट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी ही महाजन यांचे हे कृत्य अॅट्रोसिटी अंतर्गत येते. त्यामुळे त्यांच्या विरोधात जर तसा गुन्हा दाखल झाला नाही तर आपण तो दाखल करायला लावू असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण महाजन यांची अडचण वाढवणार अशी चिन्हे आहेत.