राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबईतील महापालिका ठेकेदाराने 3 महिने पगार न दिल्याने साफसफाई कामगारांनी आयुक्तांच्या बंगल्या बाहेर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची नोंद घेत घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले. त्यानंतर ठेकेदाराने त्वरित आज (सोमवार, 2 जून) या कामगारांचे पगार दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समाज समता कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार होते. या कामगारांना दोन महिन्याचे पगार आज रोखीने देण्यात आले. तसेच उर्वरित एक महिना महिन्याचा पगार आणि भविष्य निर्वाह निधी आणि अन्य रकमा लवकरात लवकर देण्याचे आश्वासन ठेकेदाराने कामगारांना दिले आहे.
( नक्की वाचा : वनविभागाच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या दगड खाणींमुळे आदिवासींच्या जमिनी संकटात? वाचा धक्कादायक रिपोर्ट )
घणसोली गट क्रमांक 72 मधील कामगारांना ठेकेदार एस. एन. म्हात्रे यांनी 3 महिने वेतन दिले नव्हते. तसेच ठेकेदाराने 14 महिन्याच्या भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. राहणीमान भत्त्यातील थकबाकी दिलेले नाही. त्यामुळे वेतना अभावी कामगारांची आणि कुटुंबियांची उपासमार होत होती.
या निषेधार्त कामगारांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांची भेट घेऊन त्वरित वेतन देण्यासाठी विनंती केली होती. तसेच जर सोमवारी हे थकीत वेतन मिळाले नाही,तर आयुक्ताच्या निवासस्थानाबाहेर भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे. यातून मिळालेल्या पैशातून कामगार दैंनदिन उदर निर्वाह करण्याचे निर्णय कामगारांनी घेतला होता , अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिली.