Navi Mumbai: बाहेरून दिसत होतं भंगारचं दुकान, आतमध्ये सुरू होता भलताच प्रकार, सर्वच जण हादरले

त्या विरोधात आता धडक कारवाई सुरू केल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

कोणत्या व्यवसायाच्या आड कोण कोणता व्यवसाय करेल हे सांगता येत नाही. मात्र अशा काही गोष्टी उघड होतात त्यावेळी एकच खळबळ उडते. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात ही अशीच एक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील नेरूळ परिसरात भंगार व्यवसायाचा मुखवटा घालून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यावर नवी मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. नेरूळ सेक्टर 28 आणि सीवूड्स रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायाचे पाळेमुळे खणून काढत पालिकेच्या पथकाने हे अनधिकृत दुकान जमीनदोस्त केले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजू राठोड हा सध्या अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांखाली कारागृहात आहे. मात्र, त्याच्या पश्चात त्याची पत्नी त्याच भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार चालवत असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अखेर या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. या धडक कारवाईमुळे नेरूळ आणि सीवूड्स परिसरात बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या धंद्यांना जरब बसणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अशा संशयास्पद व्यवसायांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: साखरपुडा झाला, मंडप सजला, पण एका झटक्यात तरुणींच्या स्वप्नांचा चुराडा झाला

मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या कारवाई दरम्यान दुकानातील सर्व भंगार साहित्य जप्त केले आहे. हे साहित्य टेम्पोच्या साहाय्याने डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात दहशतीखाली असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंगार विक्रीच्या नावाखाली अमली पदार्थांचे जाळे विणणाऱ्या नेरूळमधील एका अड्ड्यावर नवी मुंबई महापालिकेने आज सर्जिकल स्ट्राईक केला अशीच चर्चा सुरू आहे. सीवूड्स रेल्वे स्थानकासारख्या वर्दळीच्या परिसरातील सेक्टर 28 मध्ये हा काळा धंदा सुरू होता. पालिका प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

नक्की वाचा - BMC News: मुंबईच्या महापौरांचा थाट! बंगल्याच्या दुरूस्तीचा घातलाय घाट, खर्च 4 पटीने वाढला

मुंबई आणि परिसरात आमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. तरुण या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून धडक कारवाई होताना दिसत आहे. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर तर अमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक ठिकाणी छापे ही टाकले होते. कल्याण पासून टिटवाळ्यापर्यंत त्याचे धागेदोरे सापडले. नवी मुंबईत ही असे प्रकार या आधी ही घडले आहे. त्या विरोधात आता धडक कारवाई सुरू केल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.