राहुल कांबळे
दिवाळी सण जवळ येत असल्याने खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. मात्र, खरेदीच्या गर्दीत किंवा कामाच्या गडबडीत अनेकजण आपली मौल्यवान वस्तू, लॅपटॉप, रोकड किंवा दागिने गाडीत ठेवून निष्काळजीपणे कार पार्क करून जातात. हीच संधी साधत चोरटे कारच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू लंपास करत असल्याचे प्रकार नवी मुंबईत वाढत चालले आहेत. गेल्या एका आठवड्यात तुर्भे, वाशी रेल्वे स्टेशन परिसर आणि वाशी सेक्टर 17 मध्ये अशा तीन मोठ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या तिन्ही ठिकाणी चोरट्यांनी कारच्या काचा फोडून जवळपास 26 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या तिन्ही घटनांचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. त्यामध्ये दोन ते तीन चोरटे वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना दिसत आहेत. कार पार्किंग क्षेत्रात गाड्या निरीक्षण करून, चालक निघून गेल्यावर हे चोरटे काही सेकंदांत कारच्या काचा फोडतात. त्यानंतर कारमध्ये असलेल्या बॅग, लॅपटॉप, रोकड किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन फरार होतात. तुर्भे MIDC परिसरात एका व्यापाऱ्याने कार पार्क करून ऑफिसमध्ये गेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून त्याच्या बॅगेतील 8 लाख रोकड लंपास केली.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
तर वाशी स्टेशनजवळ पार्क केलेल्या कारमधून एका कंपनीच्या अधिकाऱ्याचा लॅपटॉप, ऑफिसचे दस्तऐवज आणि 3 लाखांची रक्कम चोरीला गेली आहे. वाशी सेक्टर 17 मधील पार्किंग झोनमध्ये झालेल्या घटनेत चोरट्यांनी एका व्यावसायिकाची कार फोडून 15 लाखांचा मुद्देमाल, ज्यात दागिने होते ते लांबवले आहेत. या घटनांमुळे नवी मुंबईत कार फोडून चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू केला आहे. गुन्ह्यांमध्ये एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासाठी नवी मुंबई पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मौल्यवान वस्तू, रोकड किंवा दागिने कारमध्ये ठेवू नयेत. पार्किंग करताना सुरक्षित आणि सीसीटीव्ही असलेले ठिकाण निवडावे. संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक केली असून, गर्दीच्या ठिकाणी तसेच पार्किंग झोनमध्ये गस्त वाढवण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.