- मुंबईतील पाम बीच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांकडून बेफाम स्टंटबाजी
- मागील सहा महिन्यांत येथे अनेक गंभीर अपघात झाले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे
- रात्रीच्या वेळी व्हिली, झिगझॅग राइडिंग, अवैध नाइट राईड्सचा त्रास स्थानिकांना होत आहे
राहुल कांबळे
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांकडून सुरू असलेली बेफाम स्टंटबाजी, वेगाचा तमाशा आणि अवैध रेसिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मागील सहा महिन्यांतील अपघातांच्या मालिकेमुळे हा मार्ग शहरातील सर्वात धोकादायक व अपघातप्रवण रस्त्यांमध्ये गणला जात आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार, विशेषतः रात्रीच्या वेळी व्हिली, झिगझॅग राइडिंग, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, गँग रेसिंग आणि अवैध ‘नाइट राईड्स' यांचा त्रास तीव्र झाला आहे. शनिवार-रविवार तर पाम बीच मार्ग ‘अनधिकृत रेस ट्रॅक' बनतो, अशी कुरघोडी होत असल्याची नागरिकांची नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. त्या केवळ तात्पुरत्या मोहिता होत आहेत. पण त्याचा तेवढासा परिणाम होताना दिसत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत अनेक गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. काहींना या अपघातात जीव ही गमवावा लागला आहे. वेगाच हव्यास जीव घेणा ठरत आहेत. पण स्थानिक रहिवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहेत.
या घटनांनी स्टंटबाजी आणि अतिवेगामुळे येथे निर्माण होणारा धोका पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. रात्री उशिरा तरुणांकडून होणाऱ्या नादावलेल्या स्टंटमुळे नियमित वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यावर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. “पाम बीच मार्गावरील स्टंटबाजी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि रात्री विशेष नाकाबंदी केली जाते. शनिवार-रविवार विशेष गस्त आणि कारवाई सुरू असून, वाहन जप्तीचीही कारवाई सातत्याने होत आहे असं ते म्हणाले.
नवी मुंबई अपघातांची मालिका (जुलै–नोव्हेंबर 2025)
- 28 जुलै 2025 : अतिवेगामुळे मर्सिडीज कार उलटून 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी.
- 5 ऑगस्ट 2025: स्कोडा कार व दुचाकींच्या भीषण धडकेत दोन तरुणींचा मृत्यू.
- ऑगस्ट 2025 : तीन विद्यार्थ्यांची धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल; तिघांवर गुन्हा, वाहन जप्त.
- 11 ऑक्टोबर 2025 : वेगाने येणाऱ्या स्कूटरमुळे झालेल्या साखळी अपघातात चार जण जखमी.
- 15 नोव्हेंबर 2025 : वेगावर नियंत्रण सुटल्याने झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
- नोव्हेंबर 2025 : पाम बीच मार्गावर अवैध रेसिंग करणारे अनेक युवक ताब्यात.
एकीकडे या स्टंटबाजांचा त्रास स्थानिकांना आहेच. पण ते कमी की काय पाम बीच रोडवर ताळीमरांचा सुळसुळाट ही असतो. काळोख पडायला लागला की तळीरामांचे पाय बार ऐवजी पाम बीच रोडकडे वळतात. वाईन शॉपमधून घेतलेली दारू त्या सोबतली चकणा घेवून ग्रुपच्या ग्रुप या रोडवर दारू पिताना सर्रास दिसतात. काही ग्रुप तर गाड्या रस्त्याच्या बाजूला लावून पार्ट्या करत असतात. त्यांनाही कोण पायबंद घालणार असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.