नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे आणि चुकीचा डोस दिल्याने प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका २३ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. याच रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या आणखी एका महिलेची प्रकृती खालावली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सोनम डोंगरे असे आहे. डॉक्टरांच्या या कमालीच्या हलगर्जीपणामुळे डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीन तास थांबवून ठेवले
या प्रकरणी मृत सोनम डोंगरे यांच्या पतीने रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. मृत महिलेच्या पतीने सांगितलं की, "आम्ही सोनमला प्रसूतीसाठी ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला कोणता तरी चुकीचा डोस दिला, ज्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली. आम्ही विचारणा केली असता, डॉक्टर आम्हाला तब्बल तीन तास तिथेच थांबवून ठेवून 'तिची तब्येत व्यवस्थित आहे' असे खोटे सांगत राहिले."
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
"परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी तीन तासांनी तिला वाशी येथील महापालिका रुग्णालयात हलवण्यास सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा वाशीतील डॉक्टरांनी काही वेळातच सोनम आणि पोटातील बाळाला मृत घोषित केले. ऐरोलीतील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे", असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे.
दोषींवर कडक कारवाई होणार: आरोग्य समिती सभापती
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. "ऐरोली रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येत आहे. उपचारात नेमकी काय चूक झाली, औषधांचा चुकीचा डोस दिला गेला का, या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल," असे आश्वासन डॉ. जयाजी नाथ यांनी दिले.