Navi Mumbai Koparkhairane Slab Collapse : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गुरुवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गुरुवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. येथील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी शिकवणी वर्गाचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षिकेला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. पण, या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनिष राहुल म्हस्के असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो 13 वर्षांचा होता.
नेमकं काय घडलं?
कोपरखैरणे सेक्टर 2 मधील विद्याभावन सोसायटीमध्ये ही घटना सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. ज्यावेळी हा स्लॅब कोसळला, त्यावेळी वर्गामध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि सुमारे 15 ते 20 जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी अत्यंत शिताफीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहाही जणांची सुटका केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या काही वेळ आधीच काही विद्यार्थी तिथून निघून गेले होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. ज्यावेळी दुर्घटना घडली, तेव्हा घरात एकूण 12 विद्यार्थी उपस्थित होते.
(नक्की वाचा : Pune News: लेकीसाठी बाप झाला 'सिंघम'! हुल्लडबाजाला पुण्यातील भर कॉलेजमध्येच चोपले, पाहा VIDEO )
जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे?
बचावकार्यानंतर बाहेर काढलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी चार जणांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या सर्व जखमींना तात्काळ जवळच्या ॲपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी सध्या धोक्याबाहेर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : Sangli News: बाबो! इथे पत्नीने पतीला काठीने मारण्याची आहे प्रथा; मिरजेतील 'या' होळीची राज्यात चर्चा )
इमारतीची स्थिती आणि प्रशासकीय कारवाई
विद्याभावन नावाची ही इमारत साधारण 1997 साली बांधण्यात आली असून यामध्ये एकूण 8 कुटुंबे वास्तव्यास आहेत. स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने इमारतीमधील इतर सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
ही इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याची आता तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.