राहुल कांबळे
ऐरोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नवी मुंबई हादरली आहे. दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का ही ऐरोली येथील सुषिलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. तिची सध्या परिक्षा सुरू होती.
अनुष्का 3 ऑक्टोबर रोजी शाळेत परिक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या बाकाखाली एक कॉपी सापडली. ती कॉपी अनुष्काने केल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यानंतर मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी संपूर्ण वर्गासमोर अनुष्काला अपशब्द वापरून फटकारले होते. शिवाय झोपडपट्टीवाले असे संबोधून तिचा सार्वजनिक अपमान केला, असा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली आलेल्या अनुष्काने त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी तात्काळ रबाळे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे रबाळे पोलिसांनी मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत रबाळे पोलिसांनी सर्व घटना सांगितली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही प्रकरण नोंदवले आहे. आरोपानुसार विद्यार्थिनीला वर्गात अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती असं पोलीसांनी सांगितलं. ज्यामुळे तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असं ही पोलीसांनी सांगितलं.
नक्की वाचा - Akola News: धावत्या एसटी बसची 2 चाकं झाली वेगळी, त्यानंतर चालकाने जे काही केलं ते...
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सत्य परिस्थितीचा शोध घेतला जात आहे असं ही पोलीसांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अपमानाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं वागलं पाहीजे याचीही चर्चा या निमित्ताने होत आहे.